एकाच महापालिकेत एकाच उमेदवाराला दोन पक्षांकडून उमेदवारी

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
छ. संभाजीनगर,
A single candidate nominated by two parties. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदानाचा उत्सव सुरु झाला असून सकाळपासून अनेक ठिकाणी मतदानासाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. नागरिक लोकशाहीच्या हक्काचा उत्साहाने भाग घेत आहेत, पण छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सकाळपासूनच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महापालिकेत एकच उमेदवार दोन भिन्न पक्षांकडून दोन वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवत असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
 
 
एकच नाव
 
या गोष्टीचा गौप्यस्फोट एआयएमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या ट्विटनुसार, एका उमेदवाराने एका प्रभागातून काँग्रेसच्या तिकिटावर तर दुसऱ्या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्याचा दावा केला आहे. “एकच उमेदवार एकाच महानगरपालिकेतील दोन पक्षांकडून निवडणूक लढवू शकतो का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला असून, यावर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे की नाही, याची अपेक्षा आहे.
 
 
 
राजकीय तज्ज्ञांच्या मते, दोन भिन्न मतदारसंघातून निवडणूक लढवणे कायद्यानुसार शक्य आहे. उदाहरणार्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि बडोदा येथून तर राहुल गांधी यांनी रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे महानगरपालिकेतही उमेदवार दोन वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवू शकतो. मात्र, त्याला एकाच प्रभागाचे नेतृत्व करता येते, आणि जर दोन्ही प्रभागातून विजय मिळाला तर एका प्रभागातून राजीनामा द्यावा लागतो, आणि त्या प्रभागात पोटनिवडणूक होते. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या लकी उमेदवाराचा मोठा चर्चा रंगलेला आहे. तिकीट वाटपावरून शहरात आधीच मोठा राडा सुरू होता, आणि एकाच उमेदवाराला दोन भिन्न पक्षांनी उमेदवारी दिल्याने चर्चेला नवीन उधाण आले आहे. आता सर्वांचे लक्ष या उमेदवाराच्या निवडीवर आणि कोणत्या प्रभागातून तो निवडून येतो यावर लागले आहे.