नवी दिल्ली,
Air India, IndiGo flights cancelled इराणमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट या प्रमुख भारतीय विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी तातडीच्या प्रवास सूचना आणि सल्लागार जारी केले आहेत. काही उड्डाणांचे मार्ग बदलण्यात आले असून काही उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एअर इंडियाने स्पष्ट केले आहे की, इराणचे हवाई क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे आणि प्रवाशांची तसेच विमानातील कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांच्या अनेक उड्डाणांचे मार्ग पर्यायी मार्गांवर वळवण्यात येत आहेत. त्यामुळे काही फ्लाइट्सना विलंब होण्याची शक्यता आहे. ज्या उड्डाणांसाठी मार्ग बदलणे सध्या शक्य नाही, ती उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवाशांनी एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या फ्लाइटची अद्ययावत स्थिती तपासावी, असे आवाहन एअरलाइनकडून करण्यात आले आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त करत प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले आहे.
इंडिगो एअरलाइननेही इराणी हवाई क्षेत्र अचानक बंद झाल्यामुळे त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाल्याची माहिती दिली आहे. परिस्थितीचे सातत्याने मूल्यांकन केले जात असून प्रभावित प्रवाशांना लवचिक रीबुकिंग आणि परतफेडीचे पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. ही परिस्थिती एअरलाइनच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे सांगत इंडिगोने प्रवाशांकडून संयम आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. स्पाइसजेटने देखील प्रवाशांसाठी सूचना जारी करत त्यांच्या वेबसाइटवर किंवा २४ तास कार्यरत हेल्पलाइनद्वारे फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. इराणी हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे काही उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतात. अशा प्रवाशांना आवश्यक ती मदत, तसेच त्यांच्या सोयीनुसार रीबुकिंगची सुविधा देण्यात येत असल्याचे स्पाइसजेटने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते इराणी हवाई क्षेत्र बंद राहिल्यास भारतातून युरोप, मध्य पूर्व आणि अमेरिकेकडे जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मार्ग बदलावा लागणार असून त्यामुळे विलंबाची समस्या काही दिवस कायम राहू शकते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या फ्लाइटची स्थिती तपासणे आणि संबंधित एअरलाइनने दिलेल्या पर्यायांचा लाभ घेणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.