चंद्रपूर महानगर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला गालबोट!

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
भाजपा पदाधिकारी व अपक्ष उमेदवाराच्या पतीमध्ये राडा
अपक्षाकडून भाजपा महिला कार्यकर्त्याला मारहाणीचा आरोप
पैसे वाटप, यादीत नावे नसल्याचा आणि शाई पुसल्याच्या तक्रारी
 
चंद्रपूर, 
Chandrapur Municipal Corporation Election महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान गुरूवारी चंद्रपुरात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. कधी नव्हे, एवढा गोंधळ ठिकठिकाणी उडाला. एकमेकांना मारहाण केल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले. प्रसंगी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे लागले. तसेच मतदान यादीत नाव नसणे, शाई पुसल्या जाण्याच्याही तक्रारी आल्या. एका मतदान केंद्रावर ईव्हिएम मशीन काही काळ बंद पडली होती.
 
 
kasat
 
प्रभाग क्रमांक 10 या एकोरी प्रभागात राजकीय वाद विकोपाला गेल्याने नेहरू शाळेच्या मतदान केंद्रावर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. येथील अपक्ष उमेदवार दीपा कासट यांचे पती ललित कासट यांना, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष राशीद हुसेन यांनी मारहाण केल्याचा आरोप लावला गेला. या घटनेनंतर दोन्ही बाजुचे समर्थक आमने-सामने आल्याने मतदान केंद्राबाहेर गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. जमावाला पांगवण्यासाठी आणि तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या घटनेमुळे काही काळ मतदानाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली.
 
 
Chandrapur Municipal Corporation Election तर, बुधवारी रात्री 8.40 वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात बंडखोर अपक्ष उमेदवाराने भाजपच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. भाजपा महिला कार्यकर्ता ऑटोमध्ये बसली असताना अपक्ष उमेदवाराने तिच्या साडीला व केसांना धरून जबरदस्तीन ऑटोमधून बाहेर ओढले आणि मारहाण केली असा त्यांच्यावर आरोप आहे. या हल्ल्यात महिला कार्यकर्ती जखमी झाली असून, तिला शासकीय दवाखान्यातील दाखल करण्यात आले. या घटनेमुळे बंगाली कॅम्प परिसरात तणावाचे होते. दरम्यान, संबंधित घटनेबाबत पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करावी तसेच महिला कार्यकर्तीला न्याय मिळावा, अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.
 
 
याशिवाय, ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदारांना त्यांची नावेच सापडत नव्हती. अ‍ॅपवर नावे होती. पण प्रत्यक्षात मतदान केंद्रावर नावे नसल्याने प्रचंड त्रास झाल्याच्या तक्रारी होत्या. अनेकांची नावे खूप दूरवरच्या मतदान केंद्रांमध्ये सापडली. सोबतच मतदान झाल्यानंतर बोटावरची शाई पुसल्या जात असल्याच्याही तक्रारी ठिकठिकाणाहून आल्या.