राष्ट्रीय सुरक्षेपासून अन्नसुरक्षेपर्यंत अटळ भारत-इस्रायल मैत्री; दोन्ही देश उचलणार मोठे पाऊल

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
जेरुसलेम, 
india-israel-friendship राष्ट्रीय सुरक्षेपासून अन्न सुरक्षेपर्यंत भारत–इस्रायलची भागीदारी अधिक घट्ट होत असून, दोन्ही देश आता बहुआयामी सहकार्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. दहशतवादाविरोधातील संयुक्त रणनीतींसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी, मत्स्यपालन आणि नील अर्थव्यवस्था विकसित करण्यावर दोन्ही देशांचा भर आहे.

india-israel-friendship 
 
इस्रायलचे कृषी व अन्न सुरक्षा मंत्री अवी डिच्टर यांनी स्पष्ट केले की, भारत आणि इस्रायल शाश्वत अन्न सुरक्षेच्या समान दृष्टीकोनावर एकत्र काम करत आहेत. जमीन-आधारित शेतीपासून मत्स्यपालनापर्यंत सहकार्य वाढवण्याचा दोन्ही देशांचा मानस असून, यामुळे दीर्घकालीन अन्न सुरक्षा मजबूत होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भारत आणि इस्रायलमध्ये शेती, मत्स्यपालन आणि नील अर्थव्यवस्थेतील सहकार्य वाढवण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LoI) वर स्वाक्षरी करण्यात आली. india-israel-friendship ही स्वाक्षरी दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि तांत्रिक संबंध अधिक दृढ करणारी महत्त्वाची पायरी असल्याचे डिच्टर यांनी सांगितले. याआधी एप्रिल महिन्यात झालेल्या कराराच्या पुढील टप्पा म्हणून या नव्या कराराकडे पाहिले जात आहे.
इस्रायलच्या दक्षिणेकडील इलात या किनारी शहरात आयोजित ‘ब्लू फूड सिक्युरिटी : सी द फ्युचर २०२६’ या तीन दिवसांच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या निमित्ताने हा करार झाला. भारताचे मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग आणि अवी डिच्टर यांनी संयुक्तपणे या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या परिषदेत गोड्या पाण्यातील तसेच सागरी परिसंस्थांमधून मिळणाऱ्या ‘ब्लू फूड्स’च्या माध्यमातून अन्न सुरक्षेच्या भविष्यासंदर्भात सखोल चर्चा झाली. india-israel-friendship या सहकार्यांतर्गत इस्रायलचे जल-बचत आणि जलव्यवस्थापनातील प्रगत तंत्रज्ञान भारतात वापरण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. जलसंपत्तीचे स्मार्ट व्यवस्थापन, मत्स्यपालनातील नव्या पद्धती, तसेच इस्रायल आणि भारतातील स्टार्टअप्समधील तांत्रिक व संशोधनात्मक सहकार्याला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे नवोपक्रमाला प्रोत्साहन मिळून नील अर्थव्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री राजीव रंजन सिंग यांनी या शिखर परिषदेत जागतिक मंत्रीस्तरीय पॅनेलमध्ये सहभाग घेतला. त्यांनी भारताच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील प्रगती, उत्पादनवाढ आणि रोजगारनिर्मितीबाबत माहिती दिली. अन्न सुरक्षा आणि नील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारत–इस्रायल सहकार्य भविष्यात अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरेल, असा विश्वास दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.