पत्रकारांनी निर्भीडपणे स्थानिक समस्यांचा मागोवा घ्यावा : अ‍ॅड. काळे

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
आर्वी, 
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरच्या बातम्या आपल्याला सहज उपलब्ध होतात. मात्र, स्थानिक समस्या स्थानिक वर्तमानपत्रं तसेच स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून निर्भीडपणे व निष्पक्षपातीपणाने मांडाव्यात असे आवाहन भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड. शोभा काळे यांनी केले. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित Journalist Honors Ceremony पत्रकार सन्मान समारोह कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के होते तर मदत फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी, संपादक विजय अजमीरे, जेष्ठ पत्रकार सुर्यप्रकाश भट्टड उपस्थित होते.
 
 
patrakar
 
यावेळी शोभा काळे यांनी दादासाहेब काळे, स्व.अ‍ॅड. भय्यासाहेब काळे यांच्या पत्रकारिता जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. जेष्ठ पत्रकार तथा माजी विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष अनिल जोशी यांनी पत्रकारांनी आपला व्यासंग वाढवावा व उत्तम दर्जाचे लेखन करून सकारात्मक बातम्या देखील प्रसारित कराव्या, असे मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. रवींद्र सोनटक्के म्हणाले की, येथे उपस्थित पत्रकार हे जवळपास महाविद्यालयाचेच माजी विद्यार्थी आहेत. यानिमित्ताने त्यांचा सन्मान महाविद्यालयात होणे ही अभिमानाची बाब आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने त्यांचा सन्मान करणे हे लोकशाहीसाठी पोषक असल्याचे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय अजमिरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी प्राचार्य व तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी अभय दर्भे, पत्रकार प्रकाश राठी, नजीर खान, राजेश अहिव यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
 
Journalist Honors Ceremony  ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश भट्टड यांना वर्धा श्रमिक पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. संचालन प्रा. दर्शनकुमार चांभारे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. श्यामप्रकाश पांडे तर आभार डॉ. अनिल दहाट यांनी मानले.