मार्करला रामराम! मतदानातील शाईबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
मुंबई,  
election-commission-on-ink-used राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचे आरोप समोर आले आहेत. काही मतदारांनी केलेल्या दाव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी आक्षेप नोंदवत तीव्र टीका केली आहे.
 
election-commission-on-ink-used
 
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून एकाच प्रकारची शाई वापरली जात असून ती एकदा बोटावर लावल्यानंतर सुकली की सहजपणे पुसता येत नाही. काही लोकांनी शाई कशी पुसली याबाबत आयोगाकडे ठोस माहिती नसून समाजात चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पत्रकार परिषदेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. election-commission-on-ink-used पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाघमारे यांनी सांगितले की, मार्कर पेनबाबत आलेल्या तक्रारी आणि अनुभव लक्षात घेता पुढील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मार्करचा वापर करण्यात येणार नाही. त्याऐवजी पारंपरिक आणि अधिक विश्वासार्ह अशा ‘इंडिलेबल इंक’चा वापर केला जाणार आहे.
यानुसार, ५ फेब्रुवारीपासून होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटाला मार्करऐवजी काडीने न पुसता येणारी शाई लावली जाणार आहे. या निर्णयामुळे मतदान प्रक्रियेतील संशय दूर होऊन पारदर्शकता वाढेल, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.