नवी मुंबई ,
आज (दि. 15) महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐरोली परिसरातील प्रभागांमध्ये उमेदवारांना पोलिसांनी अटक केली असून, यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी एम. के. मढवी आणि त्यांचे सुपुत्र करण मढवी यांना अटक केली. दोघांवर ऐरोली सेक्टर 16 मधील एका मतदान केंद्रावर झालेल्या मारहाणी प्रकरणी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विनया मढवी या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावरही गुन्हा दाखल झाला आहे. एम. के. मढवी प्रभाग क्रमांक 4-ड, करण मढवी प्रभाग क्रमांक 5 आणि विनया मढवी प्रभाग क्रमांक 5-ड मधून निवडणूक लढवत आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवारांना अटक झाल्यामुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली असून, पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.