वाशीम,
येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये स्वदेशी विचारसरणीची जाणीव निर्माण करणे, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे तसेच रोजगारक्षम युवक घडविण्याच्या उद्देशाने Svadesi janajagr̥ti karyakram स्वदेशी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व गुजरात पश्चिम प्रदेशाचे संघटक मनोहरलाल अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वदेशी चळवळीचा ऐतिहासिक आढावा घेत जागतिकीकरणाच्या युगातही स्वदेशी अर्थव्यवस्था मजबूत केल्यास देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आयातप्रधान मानसिकता सोडून नवसंशोधन, कौशल्यविकास आणि स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद एज्युकेशन सोसायटीच्या सचिव अॅड. वैशाली वालचाळे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रहिताचे भान ठेवावे तसेच उद्योजकता व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समाजपरिवर्तनात योगदान द्यावे, असे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे संचालक प्रसन्न वालचाळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग स्थानिक समस्या सोडविणे, स्टार्टअप्स व इनोव्हेशन आधारित उपक्रमांसाठी करावा, असे सांगितले. संचालक नीरज वालचाळे यांनी स्वदेशी व स्थानिक लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
Svadesi janajagr̥ti karyakram कार्यक्रमास स्वावलंबी भारत अभियानाचे विचार संघटक योगेश परोकर, स्वदेशी जागरण मंचचे जिल्हा संघटक मंगेश गवळी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक तेजस मारवाडी यांची उपस्थिती लाभली. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्स, स्थानिक उद्योगांतील संधी व स्वयंरोजगाराबाबत जिज्ञासापूर्ण प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. आर. राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एस. ए. व्यवहारे यांनी केले.