मुंबई,
Uddhav Thackeray made the demand राज्यातील २९ महापालिका निवडणुका सुरु असताना, अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडली, तर मतदानानंतर लावण्यात येणारी शाई सहज पुसली जात असल्याचे दिसून आले. यामुळे दुबार मतदानाचा धोका निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी निवडणूक आयोग आणि आयुक्त यांना जबाबदार ठरवत तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरेंनी सांगितले की, अनेक ठिकाणी मतदानानंतर शाई पुसली जाणे, मतदान केंद्र शोधण्यात अडचणी, ईव्हीएम मशीनमध्ये गडबड या प्रकारामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. “महापालिका निवडणुका जवळपास ८ वर्षांनी होत आहेत, तरी आयोगाची तयारी अपुरी दिसते. निवडणूक आयुक्त आणि आयोग कसले पैसे खात आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंनी विरोधकांवरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, भाजप आणि फडणवीस मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोदींना वन नेशन वन इलेक्शन हवे की ज्यामुळे असा गोंधळ घालता येईल. निवडणूक जिंकल्यासाठी पैसे वाटणे, वस्तू वाटणे, साम-दाम-दंड-भेद या पद्धतींचा वापर होत आहे. दुर्दैव म्हणजे, हे सर्व प्रकार दिसून सुद्धा निवडणूक आयोग नाकारत असल्यास, ही सत्ताधाऱ्यांसोबत मिलीभगत ठरते. सनिटायझर आणि नेलपेंट रिमूव्हरमुळे शाई सहज पुसली जाते, ज्यामुळे दुबार मतदानाचा धोका निर्माण होतो. ही लोकशाहीची हत्या आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी केली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.