वर्धेचे उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर ठरले अजित पवार!

    दिनांक :15-Jan-2026
Total Views |
एकाच पदाची चौथ्यांदा जबाबदारी
बुर्ले, पोहेकर, आकरे भाजपाचे तर शाहीण अली काँग्रेसचे स्वीकृत सदस्य
 
वर्धा, 
Wardha Municipal Corporation: Vice Chairman Pradeep Thakur नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची तिकीट मागण्यात आघाडीवर नाव असलेले प्रदीपसिंग ठाकूर वर्धा नगर पालिकेचे चौथ्यांदा उपाध्यक्ष झाले. राज्यात कायम उपमुख्यमंत्री म्हणून गमतीने अजित पवार यांचे नाव घेतले जाते. असाच प्रकार वर्धेतही घडला. अजित पवार मुख्यमंत्रिपदाच्या पंगतीत असतात. पण, त्यांच्यापर्यंत बुंदी पोहोचत नाही तसेच ठाकूर यांच्याविषयी म्हणावे लागेल. ठाकूर यांना भाजपाने उपाध्यक्ष तसेच प्रशांत बुर्ले, निलेश पोहेकर आणि कमलेश आकरे तर काँग्रेसकडून शाहीद परवीन अली या महिलेला स्वीकृत सदस्य म्हणून नियुत करण्यात आले.
 
 
pradeep
 
वर्धा नगर पालिकेचे निकाल २१ रोजी लागले. त्यात काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आले. मात्र, बहुमत भाजपाकडे होते. नप निवडणुकीत सर्वाधिक नाराजी भाजपाच्या गोटात होती. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडणुकीत आपली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आपल्यालाच संधी मिळेल अशी आशा अनेक निष्ठावान, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना होती. परंतु, भाजपाने ठेवलेल्या अटी व शर्थीत अनेकांचे मनसुबे उधळले. दोन दिवसांपूर्वी बुर्ले, पोहेकर आणि आकरे यांच्या नावाला भाजपा श्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाला. मात्र, उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात अशी चर्चा होती. ठाकूर यांच्यासोबच राखी पांडे, वंदना भुते यांच्याही नावाची चर्चा असताना सभागृहात ठाकूर यांनी भारतीय जनता पार्टीकडून तर महाविकास आघाडीत शरद पवार गटागटाकडून श्वेता पांडे यांनी उपाध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत ठाकूर यांना २९ तर पाठक यांना १० मतं मिळाले. त्यामुळे नपचे मुख्याधिकारी व पिठासीन निवडणूक अधिकारी विजय देशमुख यांनी प्रदीपसिंग ठाकूर यांची नगर पालिका उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर केले. भाजपाचे २५ नगरसेवक, २ राकाँचे तर १ अपक्ष मिळून २८ नगरसेवकांचा गट तयार करण्यात आला होता. आजच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक जयश्री आगरकर यांनी पाठींबा दिल्याने भाजपाकडे २९ संख्याबळ होते. प्रदीप सिंग ठाकूर चौथ्यांदा उपाध्यक्ष झाले. १९९६-९७ मध्ये ते पहिल्यांदा नपचे उपाध्यक्ष झाले तर वयाच्या २५ व्या वर्षी ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.
 
 
Wardha Municipal Corporation: Vice Chairman Pradeep Thakur  या निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर करण्यात आले. भाजपाकडून प्रशांत बुर्ले, निलेश पोहेकर, कमलेश आकरे तर काँग्रेसकडून शाहीण परविन अली यांना स्वीकृत सदस्य म्हणून नियुत करण्यात आले. उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होताच नगर पालिका परिसरात गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या शाहीण यांची गुलालाची उधळण करीत शहरातील मुख्य मार्गाने विजयी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांचे अभिनंदन केले.
 
आकरे यांची एन्ट्री उपाध्यक्ष कोण?
उपाध्यक्षपदाकरिता राखी पांडे यांनी दावा केला होता तर स्वीकृत सदस्यपदाकरिता प्रमोद मुरारका यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान, स्वीकृत सदस्याकरिता अचानक आकरे यांचे पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, आज दुपारी १२ वाजता नंतर उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रीया सुरू झाल्यानंतर आकरे यांची नगर पालिकेत एन्ट्री झाली आणि त्यांनी उपाध्यक्ष कोण असा प्रश्न भाजपाचे शहर अध्यक्ष निलेश किटे यांना विचारला. संपुर्ण निवडणूक प्रक्रीयेत आकरे यांच्यामध्ये उत्साह दिसत नव्हता. विशेष म्हणजे ते एकटेच आले आणि फोटोसेशनमध्ये एकटेच होते. पोहेकर आणि बुर्ले सह परिवार होते. त्यांच्या आनंद ओसांडून वाहत होता.