उपमुख्यमंत्री शिंदेंना ठाण्यात मोठा धक्का

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
मुंबई,
A setback for DCM Shinde राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी, १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले असून ठाणे महानगरपालिकेच्या निकालांकडे विशेष लक्ष लागले आहे. २०१७ प्रमाणेच यंदाही ठाणे महापालिकेत एकूण ३३ प्रभाग असून त्यापैकी ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा आहे. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ठाण्यात एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व सिद्ध केले होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत चित्र बदललेले दिसत आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र सध्याच्या सुरुवातीच्या कलांनुसार शिंदे गटाची शिवसेना २५ जागांवर आघाडीवर असून भाजप १० जागांवर पुढे आहे. ठाकरे गटाची शिवसेना एका जागेवर, मनसे एका जागेवर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ७ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या आकडेवारीमुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 
shinde
 
२०१७ मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी शिवसेनेने ६७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ जागा मिळवल्या होत्या. भाजप २३ नगरसेवकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला होता. यंदा मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतरही बहुतांश माजी नगरसेवक शिंदे गटासोबत असल्याने ठाण्यात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या सुमारे ३० वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आला आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून १९८७ ते १९९३ या कालावधीचा अपवाद वगळता येथे सातत्याने शिवसेनेची सत्ता राहिली आहे. त्यामुळे यंदा ठाणे महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
 
 
या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी स्वतः जोरदार प्रचार केला होता. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी दुचाकी रॅली काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केले होते. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, रस्ते आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या विकासकामांचा दाखला देत भविष्यात विकासाची गती अधिक वाढवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. शिवसेनेच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करत त्यांनी प्रचाराची सांगता केली होती.