अजित पवारांना पुणेकरांनी नाकारले; पुणे-पिंपरीत भाजप सुसाट

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
पुणे,
Ajit Pawar rejected by Pune  पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या मतमोजणीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. पुणे महापालिकेत भाजप तब्बल ४७ जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) केवळ १२ जागांवरच आघाडीवर आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने वर्चस्व राखत ३८ जागांवर आघाडी घेतली आहे. या निकालांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
 
 
Ajit Pawar rejected by Pune
 
प्रचारादरम्यान अजित पवार यांनी पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी हा प्रमुख मुद्दा मांडला होता. पुणे शहर वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याचा दावा करत दरमहा सुमारे ७.५ कोटी रुपयांचे इंधन वाया जात असल्याचे आणि वार्षिक नुकसान १०,८०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले होते. या समस्येवर उपाय म्हणून पीएमपीएमएल बससेवा आणि मेट्रो मोफत करण्याचा निर्णय राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आला होता. यासाठी पुणे महापालिकेला दरवर्षी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, वाहनसंख्या कमी झाल्याने प्रदूषणात घट होईल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. मात्र, मतदारांनी हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, हे मतमोजणीतील कलांवरून स्पष्ट होत आहे.
 
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण १२८ जागा असून त्यापैकी दोन जागा आधीच भाजपकडे बिनविरोध गेल्या आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप सुमारे ५० जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २६ जागांवर, शिंदे गटाची शिवसेना ७ जागांवर, तर इतर पक्ष आणि अपक्ष मिळून २ जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि मनसे यांना या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. या निकालांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.