नागपूर,
BJP dominance in Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत अनेक ठिकाणी रंगीबेरंगी निकाल दिसू लागले आहेत. पश्चिम नागपूरच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रभाग अ मध्ये काँग्रेसच्या सुकेशनी देशभ्रतार आणि भाजपच्या दर्शनी धवड यांच्यात अतीतटीची लढत सुरु आहे. त्याचबरोबर प्रभाग ब मध्ये भाजपच्या माया ईवनाते आघाडीवर असून, प्रभाग क मध्ये हरीश ग्वालबंशी यांच्या कन्या हरिता ग्वालबंशी आघाडीवर आहे. ड प्रभागात भाजपचे विक्रम ग्वालबंशी आघाडीवर आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक 9, आसीनगर झोनमध्ये बहुजन समाज पार्टीच्या तीन उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये वैशाली नारनावरे, 6 क मध्ये वंदना चांदेकर, आणि 6 ब मध्ये मोहम्मद इब्राहिम यांनी आघाडी मिळवली आहे. एकूण 38 प्रभागांमध्ये 151 जागांसाठी झालेल्या मतमोजणीच्या आधीच्या कलानुसार भाजप 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. शिंदे गटाची शिवसेना फक्त 1 जागेवर, काँग्रेस 29 जागांवर, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 1 जागेवर आघाडीवर आहे.
याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या आसीनगर झोनमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये चारही उमेदवार ऑल इंडिया मजलीस इ उत्तेहादील मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे आघाडीवर असून, हा भाग मोमीनपुरा मुस्लिम बहुल वस्तीला समाविष्ट आहे. यामुळे या प्रभागात एमआयएमची महत्त्वपूर्ण उपस्थिती दिसून येत आहे. नागपूर महानगरपालिकेतील या प्रारंभीच्या कलांनुसार भाजपचा दबदबा स्पष्ट दिसत असून, काँग्रेस आणि इतर पक्षही काही प्रभागांमध्ये टक्केवारीत आघाडी गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.