नागपूर,
constable's son became a corporator मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपाने दमदार कामगिरी करत सत्ता स्थापनेच्या दिशेने ठोस पावले टाकली आहेत. मुंबईत भाजपा–शिवसेना महायुती स्पष्ट बहुमत मिळाले असून लातूर आणि कोल्हापूर वगळता राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपाच्या हाती आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेत भाजपाने १०० हून अधिक जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. या निकालांमध्ये नागपूरमधून एक प्रेरणादायी आणि लक्षवेधी यशकथा समोर आली आहे. नागपूर महापालिकेत शिपाई म्हणून सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा थेट नगरसेवक झाला आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधून भाजपाचे उमेदवार गणेश चर्लेवार यांनी विजय मिळवला असून त्यांच्या यशानंतर रेशीमबाग परिसरात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. समर्थकांनी गुलाल उधळत हा विजय साजरा केला.

गणेश चर्लेवार यांचे वडील नागपूर महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत आहेत. एकीकडे वडील महापालिकेच्या सेवेत असताना, आता त्याच महापालिकेत मुलगा लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. गणेश चर्लेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक असून यंदा भाजपाने शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या रेशीमबाग प्रभागातून उमेदवारी दिली होती. कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि तळागाळातील नातं याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळाल्याचं बोललं जात आहे. एकूणच नागपूर महापालिकेतील निकालांनी भाजपाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली असून, गणेश चर्लेवार यांचा विजय हा सामाजिक स्तरांमधील अंतर कमी करणारी आणि अनेकांसाठी प्रेरणा देणारी कथा ठरत आहे.