जिल्हास्तरीय तीन दिवसीय प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन
वाशीम,
District Collector Yogesh Kumbhejkar महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ आहेत. महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेले उद्योग केवळ त्यांच्या कुटुंबांचेच नव्हे, तर संपूर्ण गावाच्या आर्थिक प्रगतीला गती देतात. उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळत असून, प्रशासन त्यांना सातत्याने सहकार्य करीत आहे. महिला बचत गटांनी गुणवत्ता, उद्दिष्टे आणि नाविन्यता यावर भर दिल्यास त्यांची उत्पादने केवळ जिल्हास्तरावरच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय पातळीवरही ओळख निर्माण करतील. जिल्हा प्रशासन महिला उद्योजिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य भविष्यातही करण्यात येईल.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी कुंभेजकर बोलत होते. ग्रामीण महिलांच्या कष्टातून साकारलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्यांचे आर्थिक सबलीकरण साधणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, आ. श्याम खोडे, आ. किरणराव सरनाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, मालेगाव गटविकास अधिकारी आकाश वर्मा, गटविकास अधिकारी रवींद्र सोनवणे,संजय मापारी, अॅड. गंगावणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
District Collector Yogesh Kumbhejkar कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे यांनी प्रदर्शनाची रूपरेषा, उद्दिष्टे व महिला बचत गटांसाठी असलेल्या संधींची सविस्तर माहिती दिली. आ. श्याम खोडे यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना महिलांसाठी उपलब्ध आहेत. महिला बचत गटांसाठी जिल्ह्यात चांगले काम सुरू असून, महिलांचा सर्वांगिण विकास झाला तरच देश खर्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल. जिल्ह्यात बचत गटांचे ‘उमेद मॉल’ उभारण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देऊन महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला व त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले.
प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांनी तयार केलेली अन्नपदार्थ, हस्तकला, गृहउपयोगी वस्तू, सजावटीच्या वस्तू आदी उत्पादनांची मांडणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे संचालन उमेश आगरकर यांनी केले तर आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांनी मानले. शेवटी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या जनजागृतीची चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. प्रदर्शनात महिला बचत गटांच्या सदस्यांसह उमेद अभियानाच्या संपूर्ण टीमसह अधिकारी कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.