नव्या पर्वाचा मुहूर्त

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
 
 
अग्रलेख...
municipal elections आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी, टोमणे, खिल्ली, चारित्र्यहनन, व्यंगोक्ती या सगळ्या योग्य-अयोग्य हत्यारांचा वापर करून गेल्या अनेक आठवड्यांपासून महाराष्ट्रातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या रणांगणावर साचलेला दूषित राजकारणाचा धुरळा आज खाली बसेल आणि संध्याकाळी याच रणांगणावर विजयाचे झेंडे फडकू लागतील, दूषित धुरळ्याच्या जागी गुलालाची उधळण पाहावयास मिळेल आणि ज्या मैदानावरून एकमेकांवर प्रहार झाले, तेथे आज केवळ फुलांचा वर्षाव, हारतुरे दिसतील. प्रचारासाठी प्रभाग पिंजून काढणाऱ्या फेऱ्या ज्या रस्त्यावरून निघाल्या, त्याच रस्त्यांवर आज विजयी मिरवणुका निघतील. ज्या मतदारांकडून मतांचे दान मागण्यासाठी हात जोडले गेले, त्या मतदारांना आभारपूर्वक अभिवादन करण्यासाठी विजयी उमेदवारांचे हात उंचावले जातील. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा, दीर्घकाळ रखडलेला आणि सर्वच राजकीय पक्षांच्या कमालीच्या प्रतिष्ठेचा ठरलेला महापालिका निवडणुकांचा टप्पा आता पार पडला आहे. विकासाची नवी स्वप्ने पाहणाऱ्या, विकसित अवस्थेचे समाधान मिरविणाऱ्या या शहरांची नवी राजकीय वाटचाल सुरू होईल.
 
 
 
 
विजय
 
 
 
निवडणुकांच्या आधी विविध राजकीय पक्षांनी जाहीरनामे, वचननामे किंवा अशाच काही गोंडस नावांनी मतदारांस दिलेल्या आश्वासनांची कसोटी आता सुरू होईल. अभावग्रस्ततेच्या जाणिवा उराशी धरून त्यापासून मुक्ती मिळविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सामान्य मतदारांच्या स्वप्नावस्थेचे नवे पर्वदेखील आजपासूनच सुरू होईल. ज्या गोष्टीपासून वर्षानुवर्षे वंचित राहण्याची वेळ आली, ज्या अभावग्रस्ततेमुळे असंख्य गैरसोयींचा सामना करावा लागला, त्या गोष्टी इतिहासजमा होणार, अशा अपेक्षा पल्लवित करणाऱ्या घोषणांचा आणि आश्वासनांचा गदारोळ गेल्या अनेक आठवड्यांपासून मतदारांच्या कानाशी घुमत होता. विकासाच्या मुद्यावर वारंवार लढविल्या जाणाऱ्या निवडणुका विकासाच्या मुद्यावरच लढविल्या गेल्या. विकासाच्या आश्वासनांची अगोदरच पाठीवर घेतलेली ओझी राजकीय पक्ष सांभाळतच असल्याची खात्री होऊनही, विकासाच्या मुद्याचे गांभीर्य कमी होऊ द्यायचे नाही, असे मतदारांनी ठरविले असेल, तर तो मतदारांच्या मनाचा मोठेपणा मान्य करावाच लागेल. एका बाजूला केवळ विकासाच्या मुद्यांभोवती निवडणुका लढविण्याचा झालेला आटोकाट प्रयत्न आणि दुसरीकडे अतार्किक, घासून गुळगुळीत झालेल्या बिनबुडाच्या आरोपांचे गुऱ्हाळ, केवळ मतदारांना संभ्रमित करणाऱ्या व कोणताही आधार नसलेल्या बाबींचा बागुलबुवा मतदारांसमोर उभा करून द्वेष पसरविण्याची कारस्थाने अशा वातावरणात या निवडणुका पार पडल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलटसुलट, अनपेक्षित आणि कमी-अधिक धक्कादायक अशा घडामोडी घडल्या. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना जे जमले नाही, ते राज आणि उद्धव ठाकरे यांच्या गट व पक्षांचे तब्बल दोन दशकांचे वैर मागे ठेवून हे दोघे बंधू निवडणुकीसाठी एकत्र आले. ज्या नेतृत्वाच्या संघर्षातून दोन दशकांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेचा त्याग करून राजकीय अस्तित्वाची वेगळी चूल मांडली, तो वाद विसरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य केले. गेल्या पाच-सहा वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची पुरती वाताहत झाली. अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी त्यांच्या पक्षास पुरते झिडकारून टाकले आणि मोजक्या साथीदारांनिशी एक राजकीय गट चालविणाèया उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावरच अस्थिरतेचे सावट दाटले. राज ठाकरे यांचा पक्ष तर सातत्याने गमावत राहिला होता. त्यामुळे दोघांच्याही अस्तित्वाच्या या अखेरच्या संधीसाठी अपरिहार्य ठरलेले ऐक्य या निवडणुकीच्या निमित्ताने घडले.
देशातील सर्वात मोठे अर्थकारण असलेली, सुमारे 75 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका ही राजकीयदृष्ट्या सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असे म्हटले जाते. या महापालिकेची सत्ता राखण्यासाठी आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपाप्रणित महायुती व दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती असा थेट सामना ही या टप्प्यातील निवडणुकांमधील सर्वाधिक चुरशीची बाब ठरली. आज या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याकडे केवळ मुंबईकरांचेच नव्हे, तर उभ्या देशाचे, जगाचे लक्ष लागून राहिले असून सत्ताधारी महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या भविष्यातील अस्तित्व पणाला लागले आहे. राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी, विशेषतः ठाकरे बंधूंनी आणि काँग्रेसनेदेखील विजयाची अपेक्षा सोडूनच दिली होती.municipal elections विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी दाखविलेली मानसिकता बदलून पुन्हा राज्यातील मतदारांचा विश्वास प्राप्त करण्यात फारसे प्रयत्नही न केल्याने, नगर परिषदांच्या निवडणुकांत सत्ताधारी भाजपाला विजयाचा मार्ग आपसूक मोकळा करून देत झाकल्या मुठीतील गुपित कायम राखण्यातील शहाणपणा विरोधकांनी ओळखला. आमच्यातील व्यक्तिगत हेव्यादाव्यांपेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचे आहे, असे म्हणत महाराष्ट्राची काळजी करण्याकरिता एकत्र आल्याचा कांगावा करून मुंबई महापालिकेपलीकडच्या महाराष्ट्राकडे कोठेही फारसे लक्ष न देणाèया ठाकरे बंधूंच्या पक्षास महाराष्ट्राची काळजी असती, तर तेथील जनतेच्या मतांचा कौल आजमावण्याची संधी नगरपरिषदांच्या निवडणुकांत समोर उभी असूनही त्यांनी त्या संधीकडे पाठ फिरवली, तेव्हाच महाराष्ट्राचे हित हा केवळ कांगावा असून अस्तित्वाचा प्रश्न हेच ऐक्याचे अपरिहार्य कारण असल्याचे महाराष्ट्राने ओळखले होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपले उरलेसुरले अस्तित्व आणि दिवंगत बाळासाहेबांची पुण्याई पणाला लावली, तेव्हा त्या कारणावर शिक्कामोर्तबही झाले होते. म्हणूनच या महापालिकेवरील सत्तेचे ठाकरेंच्या झेंड्याचे भविष्य आजच ठरणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईची शिदोरी एवढे एकमेव भांडवल हाती असलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे मुंबईत मराठी-अमराठी वाद भडकावण्याचे पुरेपूर राजकारण केले. मुंबईवरील मराठीचा ठसा पुसला जाऊ नये म्हणून एकत्र आल्याचे सांगणाèया ठाकरेंनी या निवडणुकीतही तेच पत्ते मतदारांसमोर धरले आणि मुंबईवरील अमराठी वर्चस्वाची काल्पनिक भीती दाखवत मराठी मतदारांना एकत्र आणण्याची खेळी केली. मराठी मतदाराचे भावनिक विश्व या नाजूक मुद्याभोवती फिरते आहे. अजूनही त्यावर संवेदनेची फुंकर घातली तर त्यांचा प्रतिसाद मिळतो, हा त्यांचा अंदाज किती खरा ठरतो, हे आज मुंबईच्या निवडणूक निकालातून स्पष्ट होणार असले, तरी मुंबई हा भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा आरसा असल्याने, या महानगरीच्या विकासात मराठी माणसाच्या बरोबरीने वाटा असलेल्या अन्य प्रांतांतील असंख्य मतदारांवर ठाकरेंच्या मराठीप्रेमापोटी अमराठींच्या विरोधात टोकाची द्वेषाची बीजे पेरण्याच्या राजकारणाचाही आज फैसला होणार आहे.
गेल्या अनेक निवडणुका सातत्याने गमावणाèया विरोधकांनी केवळ राजकारणापोटी देशातील लोकशाही यंत्रणांवरच संशयाची सुई रोखण्याचे प्रयत्न केले. निवडणूक आयोगासमोर आरोपीच्या पिंजèयात उभे करून या यंत्रणेविषयी जनतेच्या मनात अविश्वास पेरण्याचेही अनेक प्रयत्न झाले. लोकशाही यंत्रणांविषयी द्वेष पेरणे आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा मोठा आटापिटा सातत्याने सुरू राहिला. यापैकी कोणताच प्रयत्न यशस्वी झाला नाहीच; उलट आरोपांचे मुद्दे पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे साधे आव्हानही कोणीच स्वीकारले नाही.municipal elections आरोप सिद्ध न करता संभ्रम माजविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या या प्रयत्नांनाही जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही, हे निकालांवरून सातत्याने स्पष्ट होत गेले, तरी त्या प्रयत्नांचा हट्ट विरोधकांनी आजही सोडलेला नाही, अशी शंका येण्याजोगी नवी परिस्थिती महापालिका मतदान प्रक्रियेदरम्यान निर्माण झाली. मतदान केल्याची खूण म्हणून मतदाराच्या बोटावर लावण्यात आलेली शाई सहज पुसली जाते, याच्या प्रात्यक्षिकांची चढाओढ सुरू झाली. असे झाल्यास मतदारांस पुन्हा मतदान करता येईल, असा संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने निःसंदिग्धपणे हाणून पाडला आहे. शाई पुसली गेली तरी तोच मतदार पुन्हा मतदान करू शकणार नाही, याची पूर्ण दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्याने तसा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही दिला. बोटास लावण्याच्या शाईकरिता मार्कर पेन वापरण्याचा निर्णय तर निवडणूक आयोगाने 15 वर्षांपूर्वीच, सन 2011 मध्येच घेतला होता. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करून पुन्हा मतदान करणे हे गैरकृत्य ठरणार असून मतदानाच्या पवित्र जबाबदारीविषयीची नागरिकांचा बेजबाबदारपणा ठरणार आहे. मतदार या नात्याने अशा बेजबाबदारपणाचा ठपका बसू नये याकरिता निवडणूक यंत्रणेपेक्षाही, मतदारांनी सजग राहण्याची गरज आहे. कारण आरक्षणाच्या मुद्यावरून रखडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा टप्पा अजून शिल्लक आहे. तेव्हाही अशाच आक्षेपांचा आधार घेऊन संभ्रम माजविण्याचे प्रयत्न होऊ शकतात.