निवडणूक LIVE...पहिल्या टप्प्यात महायुती पुढे, ठाकरे बंधू मागे...नागपुरात भाजप युतीचा बहुमताचा आकडा पार

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur: BJP is leading. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली असून संध्याकाळपर्यंत प्रत्येक महानगरपालिकेत कोण विजयी झाला हे स्पष्ट होईल. या २९ महानगरपालिकांमध्ये एकूण ८९३ वॉर्ड आहेत, ज्यामध्ये २,८६९ जागांसाठी १५,९३१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अंदाजे ३४.८ दशलक्ष मतदारांनी आपले मत दिले असून त्यांचे भवितव्य आजच ठरेल.
 
 

स्वररत  
 
नागपुरात भाजप युतीने बहुमताचा आकडा पार
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जसजशी मते मोजली जात आहेत तसतसे निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे.सुरुवातीच्या आणि आतापर्यंतच्या कलांनुसार नागपूर महानगरपालिकेत भाजपप्रणित युतीने बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसून येत आहे. एकूण १५१ जागांच्या नागपूर महापालिकेत भाजप युतीने निर्णायक आघाडी घेतल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गडात पुन्हा एकदा भगवा फडकणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मतमोजणी अद्याप सुरू असून अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
 
 
चंद्रपुरात काँग्रेस-उबाठाचा प्रभाव
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात प्रभाग क्रमांक १० एकोरीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. या प्रभागातील अ गटातून राहुल घोटेकर, ब गटातून संजीवनी वासेकर आणि क गटातून साफिया तवंगर हे तिघे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ड गटातून एमआयएमचे अझररद्दीन शेख यांनी विजय मिळवत या प्रभागात एमआयएमचे खाते उघडले आहे. दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ जटपुरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. अ गटातून श्वेता तोतडे, ब गटातून आकाश साखरकर आणि क गटातून मनस्वी गिरहे हे तिन्ही उमेदवार उबाठा गटाकडून विजयी झाले आहेत. तर ड गटातून भाजपचे रवी लोणकर यांनी बाजी मारली आहे. या निकालांमुळे चंद्रपूर मनपामधील राजकीय समीकरणे अधिकच रंजक बनली आहेत.
 
 
अकोला महापालिकेत वंचित आघाडीचा विजय
अकोला महापालिकेच्या निकालात प्रभाग क्रमांक ३ ड मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश देव यांनी विजय मिळवला आहे. निलेश देव यांनी ५८१३ मते मिळवत प्रतिस्पर्धी सागर शेगोकार यांचा ४८१४ मतांनी पराभव केला. या विजयामुळे प्रभागात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
 
 
 
अमरावतीत राणांचा भाजपला धक्का
अमरावतीत भाजपला मोठा धक्का; युवा स्वाभिमानच्या उमेदवाराने बाजी मारली. साईनगर प्रभागात भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय पराभूत झाले. रवी राणांचे निकटवर्तीय आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे विजयी झाले. आमदार रवी राणांनी या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची होती, तरीही युवा स्वाभिमानच्या उमेदवाराने विजय मिळवून भाजपला धक्का दिला.
 
 
सोलापूरमध्ये भाजपचा डंका
सोलापूरमध्ये भाजपचा डंका; प्रभाग २३ मध्ये पक्षाचे सर्व उमेदवार विजयी. सत्यजित वाघमोडे, आरती वाकसे, ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांनी प्रभागात जोरदार विजय साजरा केला.
 
 
 
चंद्रपूर महापालिकेत उबाठा आघाडीवर
चंद्रपूर महानगरपालिकेच्या मतमोजणीच्या पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे. सुरुवातीच्या निकालांनुसार, भाजप ६ जागांवर पुढे आहे, काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे, उबाठा ७ जागांवर आघाडीवर आहे आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. या प्राथमिक कलांनुसार, महापालिकेत भाजपला मोठा फायदा झाला आहे.
 
 
सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली असून आता सुरूवातीचे कल हाती आले आहे. या कलानुसार मुंबईतील २२७ वॉर्डपैकी महायुती ६९ जागांवर आघाडीवर आहे. तर ठाकरे बंधू ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर स्वबळाचा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवलेला काँग्रेस पक्ष ११ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत.  सुरूवातीच्या कलानुसार, मुंबई महानगर पालिकेमधील २२७ वॉर्डपैकी ५१ वॉर्डमधील भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे १८ उमेदवार आघाडीवर आहेत. ठाकरे बंधूनी युती करत मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती. शिवसेना ठाकरे गट ३५ जागांवर आघाडीवर आहे. मनसे ७ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत.
 
 
भिवंडी काँग्रेसचे चार उमेदवार विजयी
भिवंडी-निजामपूर महापालिकेत काँग्रेसचे चार उमेदवार विजयी ठरल्याने मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयी उमेदवारांच्या यशावर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
 
ठाण्यात शिंदे गट आघाडीवर
ठाणे महापालिका निवडणुकीत सुरुवातीच्या फेरीत शिंदे गटाच्या शिवसेनेला आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे. प्राथमिक निकालानुसार भाजपकडे कोणतीही आघाडी नाही. शिवसेना-शिंदे गटाकडे ६ जागा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे ४ जागा, शिवसेना-यूबीटी, मनसे आणि काँग्रेसकडे आत्तापर्यंत कोणतीही जागा नाही. इतर पक्षाकडे १ जागा मिळालेली आहे. ठाणे महापालिकेतील सुरुवातीच्या फेरीत राजकीय समीकरण स्पष्ट होताना दिसत आहे.
 
नागपुरात भाजप १४ जागांवर आघाडीवर 
नागपूर महानगरपालिकेच्या मतमोजणीला टपाल मतांच्या मोजणीपासून आज सकाळी सुरुवात झाली असून प्राथमिक कल समोर येत आहेत. सुरुवातीच्या फेरीत भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेसला काही ठिकाणी सुरुवातीची आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, मनसे, शरद पवार गट आणि इतर पक्षांना या टप्प्यावर आपले खाते उघडता आलेले नाही. नागपूर महानगरपालिकेत एकूण १५१ जागांसाठी निवडणूक झाली असून सुरुवातीच्या टप्प्यातील आघाडीची स्थिती अशी आहे: भाजप १४ जागांवर आघाडीवर, शिवसेना, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे आत्तापर्यंत कोणतीही जागा नाही. सर्वांचे लक्ष पुढील फेऱ्यांकडे लागले आहे, कारण प्राथमिक कलानंतरही चित्र बदलू शकते. अधिकृत निकालांसाठी मतमोजणी सुरूच आहे आणि संपूर्ण परिणाम जाहीर होईपर्यंत राजकीय समीकरणावर चर्चा सुरु राहणार आहे.
 
मालेगावमध्ये एमआयएम आघाडीवर
मालेगाव महापालिकेतील मतमोजणीत सध्या प्रभाग १८ मध्ये एमआयएमचे उमेदवार अल्कमा अब्दुल करीम आघाडीवर आहेत. तसेच प्रभाग १८ मध्ये शेख सिकंदर पहिलवान आणि प्रभाग २० मध्ये इस्लाम पार्टीच्या मेहमूदाबानो आघाडीवर आहेत.
 

बीएमसीमध्ये भाजप-शिवसेना-यूबीटीत जोरदार टक्कर

बीएमसी निवडणुकीच्या प्रारंभिक रुझानांनुसार भाजप युती आणि शिवसेना-यूबीटी युतीच्या मधे जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत २७ वॉर्डवर भाजप युती आघाडीवर आहे, तर शिवसेना-यूबीटी युती १७ वॉर्डवर पुढे आहे. काँग्रेसला फक्त २ वॉर्डवर आघाडी मिळाली आहे. 
 
 
पुण्यात पोस्टल मतांवर भाजप आघाडीवर...
पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या पोस्टल मतमोजणीत सुरुवातीच्या निकालानुसार भाजप ३२ ठिकाणी आघाडीवर आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला २ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर शिवसेना-उबाठाला कोणतीही आघाडी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस १४ जागांवर पुढे आहे, काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे, तर इतर पक्षांना या टप्प्यावर कोणतीही जागा मिळालेली नाही.