opponents पूर्वी एक विचित्र मानसिकता अस्तित्वात होती. अनेक कथा, चित्रपट इत्यादींमधूनही ही मानसिकता दाखवण्यात आली होती. एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर सगळा दोष स्त्रीवर टाकला जायचा. तिला वांझ म्हणून हिणवलं जायचं. केवळ पुरुषच नव्हे तर आजूबाजूच्या स्त्रियाही तिलाच दोष द्यायच्या. पण त्या पुरुषामध्ये काही दोष असू शकतो हे मान्य करायला कुणी तयार नव्हतं. दोष असणं म्हणजे नपुंसकत्व वगैरे अशी भाबडी समज त्या काळी अस्तित्वात होती. पण दोष मान्य करून त्या दोषावर उपचार करता येऊ शकतो आणि ‘बाबा’ही होता येऊ शकते. आता मात्र काळ बदललाय. मानसिकताही बदलली आहे. या गोष्टीसाठी केवळ स्त्रीला दोष न देता दाम्पत्य जबाबदारी स्वीकारत त्यावर मात करत आहेत. स्त्रीला सन्मान दिला जात आहे, तिला समानतेने वागणूक दिली जात आहे. ही खरोखरंच एक चांगली बाब आहे. मात्र दुर्दैवाची बाब अशी की राजकीय पटलावरील भारतीय जनता पक्षाचे विरोधक अजूनही त्या जुन्या मानसिकतेत वावरतात. आपल्याकडे वर्षभराच्या अंतराने लोकसभा, विधानसभा आणि मग आता पालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये तुम्हाला विविध घटक आणि ब्रॅण्ड दिसले असतील. पण एक पॅटर्न बदलला नाही आणि तो म्हणजे रुदाली पॅटर्न. विरोधकांनी एक गोष्ट मनाशी ठरवून ठेवलेली आहे की जर ते जिंकले तर हा त्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम आहे आणि जर हरले तर ईव्हीएम घोटाळा, व्होट चोरी, शाई पुसली इत्यादी अनेक घटक त्यासाठी कारणीभूत असतात.

आता पालिकांच्या निवडणुकीतही हे रडणारे आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी केलेले आरोप हे केवळ बालिशच नव्हे तर मूर्खपणाचे होते. भाजपाने ईव्हीएममध्ये आधीपासूनच मते घालून ठेवल्याचा आरोप हा पराकोटीचा मूर्खपणा दाखवणारा होता. आपल्याकडे एक यंत्रणा आहे. ती यंत्रणा इतर देशांपेक्षा अत्यंत सुरळीतपणे सुरू असते. काही त्रुटी नक्कीच आहेत आणि त्यावर कामही झाले पाहिजे. पण इतका मोठा देश असताना ज्याप्रकारे निवडणुकीची प्रक्रिया हाताळली जाते त्याला तोड नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी यंत्रणेवर दोष लावणे हे लोकशाहीसाठी बाधक आहे. हे ईव्हीएमचे रडगाणे काँग्रेसने 2014 पासून सुरू केले आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी हे रडगाणे सुरू ठेवले. त्यानंतर काँग्रेसचे बळजबरीचे युवराज यांनी व्होट चोरी नावाची आणखी एक बोंब मारली. त्यांच्या अरे ला हो रे करत इतर ठिकाणच्या पक्षांनीही व्होट चोरीचा मुद्दा उचलून धरला. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंनी रान पेटवण्याचा प्रयत्न केला पण विधानसभेत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विजय खेचून आणला. आता पालिका निवडणुकीत राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी मतदारयादींमध्ये घोळ इत्यादी मुद्दे उपस्थित केले. निवडणुकीच्या दिवशीही शाई पुसली इत्यादी वाह्यात नॅरेटिव्ह चालवण्यात आले. या सगळ्या गोष्टींचा हेतू काय? तर मतदारांमध्ये राज्य व केंद्रातील सत्तेविरुद्ध रोष पसरवणं. एका चॅनलच्या एका तरुण महिला पत्रकाराने तर ठाकरेंसाठी फुल बॅटिंग केली. आपण बातमी देत आहोत की ठाकरेंचा प्रचार करत आहोत, याचाही विसर त्या मुलीला पडला. निवडणुकीच्या दिवशी त्या महिलेने शाई पुसते इत्यादी नॅरेटिव्ह पसरवलं आणि मग सगळे जण मूर्खासारखे शाई पुसणारे व्हिडीओ टाकू लागले. पालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणारा मार्कर पेन खूप काळापासून वापरला जात आहे. पण शाई पुसण्याचे उद्योग तेव्हा कोणी केले नव्हते. ती महिला अशी का वागली याचं उत्तर राज-उद्धव यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेत दडलंय. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी सर्व मराठी पत्रकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावेळी मी या वक्तव्यावर टीकाही केली होती. कारण सहकार्य करायचे म्हणजे काय करायचे? तर खोटे नॅरेटिव्ह चालवायचे? लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. इतकं करूनही सत्ता मिळत नाही. राज ठाकरेंनी सत्तेवर प्रश्न उठवला. पण त्यांना मतदारांनी केव्हाच नाकारलं आहे, याची जाणीव त्यांना होत नाही. एक दशक झालं मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
बरं एक्झिट पोल आल्यानंतरही उद्धव ठाकरेंचा चेहरा पडलेला होता आणि त्यांनी भाजपावर निवडणुकीत घोळ घातल्याचे वक्तव्य केले. ‘‘ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, ठाकरे म्हणजे मुंबई नाही आणि ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही’’ असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. हे ठाकरे मान्य का करत नाहीत? तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येता तेव्हा प्रचंड मोठे गैरसमजही घेऊन जन्माला येता का? बाळासाहेबांना सगळेच जण मान द्यायचे पण तो मान त्यांच्या वंशजांना का मिळावा? त्यासाठी त्यांनी प्रयत्न नको का करायला? निवडणुकीच्या काही दिवस आधी ठाकरेंनी युतीची घोषणा केली. त्यांचे पारंपरिक मतदार सोडले तर या युतीची चर्चा किंवा प्रभाव मुंबईत मला तरी दिसला नाही. केवळ यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून निवडणूक जिंकता येईल का? केवळ टीका करून, टोमणे मारून लोकांच्या मनात घर करता येईल का? उद्धव ठाकरे भाजपाला फसवून मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना कामे करण्याची नामी संधी लाभली होती.opponents पण त्या काळात भ्रष्टाचाराचा महापूर वाहत होता असे आरोप झाले, गैरकृत्य, गुंडगिरीचं राज्य आल्यासारखे लोक वावरत होते. किती जणांना मारहाण, संशयास्पद मृत्यू आणि काय काय नुसता हैदोस! तुम्ही जर थेट जनतेलाच त्रास देणार असाल तर जनता तुम्हाला का निवडून देईल? त्या काळात फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि ते रस्त्यावर उतरून काम करत होते, पण उद्धव ठाकरे बंगल्यावर बसून होते. हा कार्यकाळ मराठी माणूस कसा विसरेल. या निवडणुकीत काँग्रेस तर केवळ तोंडी लावायला होती. एका व्यक्तीला पंतप्रधान करण्यासाठी, त्याचं राजकीय करीअर बनवण्यासाठी सबंध काँग्रेस पक्षाची वाताहत केली. आता हे सगळे मिळून पुन्हा रडणार आहेत. ‘‘27 पालिकांमध्ये युतीतल्या कोणत्या तरी पक्षाची सत्ता असेल आणि भाजप नंबर 1 असेल.’’ हे म्हणणं देवेंद्र फडणवीसांनी खरं करून दाखवलं आहे. पण अजूनही त्यांच्या विरोधकांना आपली चूक कदाचित कळणार नाही. ते रडत राहतील. कधी ईव्हीएमच्या नावाने, कधी व्होट चोरीच्या नावाने, कधी शाई पुसली म्हणून. पण जनता आपल्याला का नाकारतेय याची सतत्या ते पारखून पाहणार नाहीत. असो... मल्लिका शेरावतचं एक गाजलेलं गाणं आहे, नाम जलेबी बाई. या पृष्ठभूमीवर विरोधकही गाणं गात आहेत, ‘‘नाम रुदाली बाई’’!
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री