सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळतो : आ. सई डहाके

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित भारावले
 
कारंजा लाड, 
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून आपल्यातील कला प्रदर्शीत करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक शाळांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक असून गोविंद स्कूलचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन Sai Dahake आ. सई डहाके यांनी गोविंद स्कुलच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
 
 
sai
 
स्थानिक गोविंद इंग्लिश पब्लिक स्कूल व गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने १३ जानेवारी रोजी शेतकरी निवास सभागृहात शाळेतील विद्यार्थ्यांकरीता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके तर उद्घाटक म्हणून Sai Dahake आमदार सई डहाके यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्थेने केलेले कार्य गौरवास्पद असून, सामाजिक व शैक्षणिक चळवळीत गोविंद स्कूल चे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत अध्यक्षीय मनोगतातून माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांनी व्यक्त केले.
 
 
या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अरुण ताथोड, बाजार समितीचे संचालक नितीन नेमाने, नगरसेविका शालिनी ठाकरे, नगरसेविका वैशाली गुल्हाने, नगरसेविका कुसुम अघम, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे, माजी नगराध्यक्ष संजय काकडे, नगरसेवक अजय श्रीवास, नितीन गढवाले, सागर अंभोरे, योगेश यादव, सुनील ऐतनगरकर, अमोल राऊत,सुरेश फालके, माधव वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाट्य व विविध सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण चौधरी, संचालक संतोष चौधरी, संचालिका स्वप्नाली चौधरी, मुख्याध्यापिका अर्चना काकडे, मुख्याध्यापिका अपर्णा कदम तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका किरण व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मनिष वडते व रिना कनोजे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात नृत्याविष्कार, नाटिका, वेशभूषा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता.