मतमोजणीपूर्वीच महापालिकांमध्ये आघाडीची झळाळी !

    दिनांक :16-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Victorious in the municipal corporations मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असतानाच महायुतीने निवडणुकीपूर्वीच मोठी बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. निकाल जाहीर होण्याआधीच राज्यभरातून तब्बल ६९ उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्याने महायुतीत उत्साहाचे वातावरण आहे. या बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये भाजपने सर्वाधिक यश मिळवले असून निवडणूक निकालापूर्वीच भाजपच्या खात्यात मोठी भर पडली आहे.
 

Victorious in the municipal corporation 
 
सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून या ६९ बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना अधिकृत विजय प्रमाणपत्र दिले जाणार आहे. राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक जागा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील आहेत. केडीएमसीमध्ये भाजपचे १५ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जळगाव महानगरपालिकेत एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून त्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी ६ उमेदवार आहेत.
पनवेल महानगरपालिकेत भाजपचे सर्व ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून ठाणे या शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात ७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. भिवंडी महानगरपालिकेत भाजपचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अहिल्यानगरमध्ये भाजपचे ३ तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. धुळे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्येही भाजपने आपले खाते उघडले असून मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
बिनविरोध विजयी उमेदवारांच्या यादीनुसार कल्याण-डोंबिवली, पनवेल, भिवंडी, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महानगरपालिकांमध्ये भाजपचे अनेक उमेदवार आधीच विजयी ठरले आहेत. तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेनेही कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि जळगावमध्ये आपली ताकद दाखवली आहे. अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला दोन जागांवर यश मिळाले असून मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच महायुतीला मिळालेले हे यश आगामी निकालांसाठी महत्त्वाचे मानले जात असून राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची आघाडी अधिक मजबूत होण्याचे संकेत मिळत आहेत.