नेसरी,
death of mother and child : अपघातात बाळंतिणीचा मृत्यू होऊनही संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त जमावाने नेसरी येथे तीव्र आंदोलन केले. संतप्त नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारला आग लावली, तसेच नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिस उपनिरीक्षक आबा गाढवे यांच्या निलंबनाची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
चंदगड-गडहिंग्लज राज्य मार्गावर गुरुवारी दुपारी हा भीषण अपघात घडला. अडकूर येथील राहुल विजय कुंदेकर हे पत्नी सुवर्णा, सात दिवसांचे नवजात बाळ, सासू आणि दोन वर्षांच्या मुलासह चारचाकी वाहनातून गडहिंग्लजहून अडकूरकडे निघाले होते. यावेळी चंदगडकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या दुसऱ्या चारचाकी वाहनाने कानडेवाडीजवळ त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कुंदेकर कुटुंबातील सर्वजण गंभीर जखमी झाले.
जखमी बाळंतिणी सुवर्णा कुंदेकर यांचा शुक्रवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेने अडकूर ग्रामस्थांसह नातेवाईक संतप्त झाले. अपघातास कारणीभूत कार चालक स्वप्निल रवींद्र रानगे (रा. कोल्हापूर) याला तात्काळ अटक करण्याची मागणी करत जमावाने नेसरी पोलिस ठाण्यावर धडक दिली. मृत बाळंतिणीचे पार्थिव आणि अंत्यसंस्कारासाठी आणलेली लाकडे पोलिस ठाण्यासमोर आणल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली.
या प्रकरणात अडकूरच्या सरपंच गिरीजादेवी शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्याकडे पोलिस उपनिरीक्षक आबा गाढवे यांना निलंबित करण्याची मागणी केली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी संतप्त जमावाने अपघातातील आरोपीची कार पेटवली. आरोपी चालकाला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच जमाव शांत झाला.
या घटनेमुळे कुंदेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राहुल कुंदेकर यांच्या वडिलांचे ४ जानेवारीला निधन झाले होते, तर ९ जानेवारीला सुवर्णा यांनी बाळाला जन्म दिला. बाळाला घरी घेऊन जात असतानाच झालेल्या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे, तर अपघातात जखमी झालेल्या आठ दिवसांच्या नवजात बाळाचाही कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आईपाठोपाठ बाळाचाही मृत्यू झाल्याने अडकूर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.