मद्यपी बसचालकावर गुन्हा दाखल

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
सिंदेवाही, 
drunk-bus-driver : दारू पिऊन बस चालवणार्‍या आणि प्रवाश्यांचे जीव धोक्यात टाकणार्‍या एसटी बस चालकावर सिंदेवाही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसटी वाहक प्रकाश लोणारे यांच्या तक्रारीवरून सिंदेवाही पोलिसांनी केली आहे. कपिल निरंजन खोब्रागडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे.
 
 

संग्रहित फोटो  
 
 
 
एसटी क्रमांक एमएच 07 सी 9268 ही चिमूरवरून सिंदेवाहीकरिता सायंकाळी 4.15 मिनिटांनी निघाली होती. त्याची जबाबदारी चालक कपिल निरंजन खोब्रागडे व वाहक प्रकाश मोतीराम लोणारे यांच्यावर होती. दरम्यान, सिंदेवाही ते पाथरी व पाथरी ते सिंदेवाही अशी फेरी मारून रात्री 8 वाजताच्या सुमारास सिंदेवाही ते कारव्हा येथे बस ‘हॉल्टींग’ घेवून जात असताना आरोपी चालक कपिल खोब्रागडे (35) हा दारू पिवून होता. तो वाकडी तिकडी बस चालवून कुठेतरी अपघात करेल या भितीने वाहक प्रकाश लोणारे यांनी गडबोरीजवळील उमरवाही फाट्यावर बस थांबविण्यास सांगितले.
 
 
ते आपले सर्व साहित्य घेवून गडबोरीच्या बस स्थानकावर उतरले. ही माहिती वाहतूक निरीक्षक सुरज मून व चिमूर आगार व्यवस्थापक यांना देण्यात आली. त्यानंतर वाहक प्रकाश लोणारे यांनी सिंदेवाही पोलिस ठाणे गाठून बसचालक कपिल खोब्रागडे याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कपिल खोब्रागडे यांच्याविरूद्ध कलम 185, 85, 355 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.