चंद्रपूर,
municipal-corporation-election : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चंद्रपूर महानगपालिकेची निवडणूक पार पडली. शुक्रवारी निकाल जाहीर झाले. त्यात, तांत्रिकद्दष्ट्या कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नाही. 27 जागा जिंकून काँगे्रस जरी सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी भारतीय जनता पार्टीलाही 23 जागांवर विजय मिळाला आहे. या दोन्ही पक्षांना मिळविलेल्या जागांमध्ये तसे फार अंतर नाही. पण दोघांचेही मित्रपक्ष जोडले तरी बहुमताचा 34 जागांचा आकडा कुणालाही गाठता येत नाही. त्यामुळे सध्यातरी नैसर्गिक न्यायाने काँगे्रस आणि भाजपाला सत्ता स्थापनेचा दावा करता येतो आणि तो केलाही जात आहे.

जनविकास आघाडीला आपल्यासोबत घेतल्याने त्यांच्या तीन जागांचे पाठबळ काँगे्रस पक्षाला आधीच मिळाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांच्या 30 जागा झाल्या आहेत. बहुमताच्या जादुई आकड्यापर्यंत पाहोचण्यासाठी त्यांना 4 नगरसेवकांची गरज आहे. एमआयएम व बसपाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. हे पक्ष काँगे्रसच्या जास्त जवळ असल्याचा त्यांचा दावा अगदीच चुकीचा नाही. त्यामुळे या पक्षाचे नगरसेवक काँगे्रससोबत आल्यास त्यांच्याकडे एकूण 32 नगरसेवकांचे पाठबळ असेल, असे गृहित धरू या. तरीही उर्वरित दोन जागा जोडण्याचे कसब खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. विजय वडेट्टीवार यांना दाखवावे लागणार आहे.
काँगे्रस खालोखाल भारतीय जनता पार्टीने आपले 23 नगरसेवक निवडूण आणले आहेत. त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेलाही (शिंदे गट) एक जागा मिळवता आली. त्यामुळे या युतीकडे सध्या 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपा-सेनेला आणखी 10 नगरसेवक जोडावे लागेल. हे काम काँगे्रसच्या स्थितीशी तुलना करता थोडे अवघड असले तरी भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा ज्यांनी केला आहे ते माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार हे जाणते आणि दिग्गज नेते आहेत. सार्याच, अगदी विरोधी विचारांच्या पक्षांतील नेत्यांसोबत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंधही आहेत. त्यामुळे त्यांच्या दाव्याला सहज घेण्याची चूक काँगे्रसने केली, तर हाती आलेला घास हिरावला जाऊ शकतो यात वाद नाही.
काँगे्रसचा डोळा जर उबाठाच्या 6 जागांवर असेल, तर ते वाटते तेवढे सोपे नाही. कारण उबाठाला या निवडणुकीत सोबत घेण्यात खा. धानोरकर फार उत्सुक नव्हत्या आणि त्यामुळे त्यांच्यातील वाटाघाटी फिस्कटल्या. रागाच्या भरात उबाठाने आपली वेगळी चूल मांडली आणि 6 जागी आपले उमदेवारही निवडूण आणले. त्यामुळे त्यांचे नाक तसे वर आहे. ते तोंडही मोठे फाडू शकतात. आरक्षणात बसले तर कदाचित महापौर पदाची मागणीही ते करू शकतात. राहता राहिला प्रश्न दोन अपक्षांचा, जे आ. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार त्यांचेच आहेत. तर हाही दावा थोडा अतिशयोक्तीचा वाटतो. कारण नंदू नागरकर यांनी अपमानाचे विष पिऊन स्वतःला निवडूण आणले आहे. तर दुसरे अपक्ष नगरसेवक प्रशांत दानव यांचे मुनगंटीवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे हे वडेट्टीवार यांच्याकडे जातीलच हेही सांगता येत नाही. त्यांचीही ‘बार्गेनिंग पॉवर’ एव्हाना वाढली आहे. अशा स्थितीत उबाठा, अपक्ष आणि वंचित व एमआयएम जर भाजपाला मिळाले तर बहुमत प्राप्त करणे भाजपासाठीही अशक्य नाही. मुनंटीवार ही किमया करू शकतात. त्यामुळे सध्यातरी राजकारणाच्या नियमानुसार काहीही होऊ शकते.
महापौर बनवण्याची संधी आम्हालाहीः आ. सुधीर मुनंटीवार
चंद्रपूर महाानगरपालिकेच्या जनतेनी या अटीतटीच्या निवडणुकीत महापौर बनविण्याची संधी ही आम्हालाही दिलेली दिसत आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहूमत नाही. अपक्ष व इतर पक्षाच्या नगरसेवकांनी या शहराच्या सर्वांगिण प्रगती आणि विकासासाठी भारतीय जनता पार्टीला समर्थन देण्याच्या संदर्भात आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापौर हा भारतीय जनता पार्टी आणि त्यांना समर्थन देणार्या मित्र पक्षाचा बनेल, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
काँगे्रसचाच महापौर होणारः आ. विजय वडेट्टीवार
या निवडणुकीत काँग्रेसने 27 नगरसेवक जिंकले असून, जनविकास आघाडीचे तीन नगरसेवक काँग्रेस सोबत आहेत. पक्षाने तिकीट न दिल्याने बंडखोरी करून निवडूण आलेले दोन अपक्ष उमेदवार देखील आमच्यासोबत येतील. उबाठाने 6 जागा जिंकल्या आहेत. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचा महापौर बसणार, असा दावा आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.