भक्तीचा 'नादब्रह्म' आणि सेवेचा 'महायज्ञ'!

चिखली येथील श्री गणपती संस्थान चा उपक्रम

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
पवनकुमार लढ्ढा,
चिखली,
chikhli-shri-ganpati-sansthan : उत्सव आणि सण हे भारतीय संस्कृतीचे वैभव आहेत. पण जेव्हा या उत्सवांना शिस्त आणि सामाजिक बांधीलकीची जोड मिळते, तेव्हा त्यांचे पावित्र्य अधिकच वाढते. चिखली येथील जुने गाव परिसरातील श्री गणपती संस्थानात आज 'श्री गणेश जयंती सोहळ्या'च्या निमित्ताने जे घडले, ते केवळ कौतुकास्पदच नाही तर सर्व समाजासाठी, विशेषतः युवा पिढीसाठी दिशादर्शक आहे.

jk 
 
 
​शिस्तीचे अनोखे दर्शन
 
 
एकीकडे ५०१ गणेश भक्तांच्या मुखातून होणारा 'गणपती अथर्वशीर्षा'चा सामूहिक गजर आणि दुसरीकडे ७५ भक्तांनी केलेले रक्तदान, हा 'भक्ती' आणि 'शक्ती'चा अनोखा संगम आज चिखलीकरांनी अनुभवला. ५०१ भक्तांनी एकाच लयीत, एका सुरात १०,५२१ आवर्तने पूर्ण करणे, हे केवळ धार्मिक कार्य नाही, तर ती सांघिक शिस्तीची एक अनुभूती होती. जेव्हा शेकडो कंठातून ओंकार आणि मंत्रोच्चार होतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या सकारात्मक लहरी मनाला शांत करतात आणि परिसरात एक पवित्र वलय निर्माण करतात. चिखली सारख्या शहरात अशी शिस्तबद्धता पाळली जाणे, हे आयोजकांच्या सुयोग्य नियोजनाचे यश आहे.
 
​रक्तदान: खरी ईश्वरसेवा
 
 
मात्र, या सोहळ्याचे खरे यश हे ७५ रक्तदात्यांच्या दातृत्वात आहे. 'विघ्नहर्ता' गणरायाची पूजा करताना, रक्ताची गरज असलेल्या एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवून त्याच्या आयुष्यातील 'विघ्न' दूर करणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे. रक्ताला कोणताही धर्म, जात किंवा पंथ नसतो. मंदिरात जमलेल्या गर्दीचे रूपांतर जेव्हा अशा विधायक कार्यात होते, तेव्हा मंदिरांचे खऱ्या अर्थाने 'संस्कार केंद्रात' रूपांतर होते.
 
​जुने गाव, नवी दिशा
 
 
चिखलीच्या 'जुने गाव' परिसरातून हा उपक्रम राबवला गेला, याला एक विशेष महत्त्व आहे. शहराचा विस्तार होत असताना जुन्या भागातील संस्कृती टिकवून ठेवण्याचे आणि तिला आधुनिक सामाजिक सेवेची जोड देण्याचे काम श्री गणपती संस्थानाने केले आहे. आजकाल तरुणाई भरकटत चालल्याची ओरड होत असताना, या कार्यक्रमात तरुण आणि महिलांचा असलेला उत्स्फूर्त सहभाग आश्वासक आहे. संस्कार आणि परंपरेचा वारसा असाच पुढे नेल्यास समाज सुदृढ राहायला मदत होईल.
 
 
​आज अनेक सार्वजनिक उत्सवांमध्ये पैशांचा अपव्यय आणि डीजेचा गोंगाट पाहायला मिळतो. अशा काळात १०,५२१ मंत्रांच्या लहरींनी वातावरण शुद्ध करणे आणि ७५ पिशव्या रक्तदानातुन माणुसकी जपणे, हा श्री गणपती संस्थानाने घालून दिलेला पायंडा अत्यंत आशादायी आहे.
 
 
​धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमांची जोड देऊन, 'नरसेवा हीच नारायण सेवा' हा संदेश कृतीतून देणाऱ्या विश्वस्त मंडळ, उत्सव समिती आणि सर्व सहभागी भाविक भक्तांनी यासाठी सहकार्य केले.