अमरावती,
navneet rana आम्ही भाजपाचे निष्ठावंत, परिश्रम करणारे व समाजाशी नाळ जुळलेले उमेदवार होतो. या मनपा निवडणुकीत आमचा पराभव विरोधी पक्षाने नव्हे तर भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत राणा यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी करून केला आहे. भाजपात राहून भाजपाचाच काटा काढण्याचे काम त्यांनी केले असल्याने त्यांचे पक्षातून निष्कासन करण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या २२ उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीने चांगलीच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांना सामुहीकपणे पाठविलेल्या पत्रात उमेदवार पुढे म्हणतात, नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. त्यांनी प्रथम भाजपाचे गढ असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेलवर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचे नियोजन केले. एकीकडे भाजपाच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉ. धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या. भाजपाचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला. निवडणुकीत पैश्याची लयलूट केली. आमच्या प्रभागात मतदारांवर प्रचंड दबाव उभा केला. नवनीत स्वतः भाजपाच्या नेत्या असल्याने त्यांनी भाजपा पदाधिकारी सोबत घेतले आणि त्यांनी आमच्या पराभवासाठी कंबर कसली. मोहल्ल्या मोहल्ल्यात, प्रत्येक नगरात कडाडून भाषणे, प्रचार रॅली काढून आमच्या उमेदवारीविषयी जनतेत संभ्रम उभा केला. आम्ही जिथे लोकांना भेटलो तिथे लगेच नवनीत राणा जाऊन आमच्या प्रचारावर पोछा मारत होत्या. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आम्हाला आशीर्वाद असल्याचे आणि तेच पाठीशी असल्याचे राणा दाम्पत्य खुलेआम सांगत होते. भाजपाचे मतदार या प्रचाराने संभ्रमित झाले.
आम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आ. रवी राणा यांचे झोकून देऊन काम केले. पण, नवनीत यांनी जाहीरपणे आम्हालाच गद्दार ठरवून आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याना उध्वस्त केले. भाजपाच्या प्रभावक्षेत्रात भाजपाला मूठमाती देऊनच राणा दाम्पत्याने मनपा निवडणुकीत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पत्नीला ’स्टार प्रचारक’ भाजपा नेता दर्शवून भाजपा उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम राणा दाम्पत्याने केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात राणा दाम्पत्य फिरकले देखील नाही. तिथे भाजपा कमी करण्याची छुपी व्यूहरचना त्यांनी आखली.
आम्ही हरलो. पराभव आम्हाला मान्य आहे. पण आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी कमळ हातात घेऊन पक्षाशी गद्दारी करून केला. भविष्यात भाजपाचा सुपडा साफ होऊ नये म्हणून कळकळीने आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती करतो की, एखादा पराजय झाला तरी चालेल पण यांच्या नादी लागून पक्ष संपवू नका.navneet rana तात्काळ नवनीत राणा यांना युवा स्वाभिमान पक्षासाठी मोकळे करा. यांनी अशीच राष्ट्रवादी काँग्रेस संपवली होती. राकाँला पुन्हा पक्ष उभा करायला दहा वर्ष लागले. भाजपा वाचवा ही आमची विनंती आहे. आमच्या पैकी काही सहकारी विजयी झाले आहेत. पण, त्यांना हरवण्यासाठी देखील नवनीत राणा यांनी कसून प्रयत्न केल्याचे निवेदनात नमुद आहे. निवेदनावर आशिष अतकारे, अभिजित वानखडे, चेतन गावंडे, ऋषी खत्री, डॉ. वीरेंद्र ढोबळे, नरेश धामाई, सुनंदा खरड, मृणाली चौधरी, चेतन पवार, रोशनी वाकडे, बरखा शर्मा, रिटा मोकळकर, संतोष पिढेकर, गौरव बांते, प्रणित सोनी, योगेश निमकर, राजेश पड्डा साहू, लता देशमुख,स्वाती निस्ताने यांनी स्वाक्षरी केल्या आहे.