गडचिरोली,
Malaria Control गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप (मलेरिया) पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य हिवताप टास्क फोर्स समितीची (कार्यगट) 13 जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठक डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने राबवायच्या 15 कलमी कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे नियोजन तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हिवताप सर्वेक्षणासाठी रिक्त असलेल्या जागी आर. टी. वर्कर्सची नियुक्ती करून त्यांचे प्रशिक्षण मे 2026 पर्यंत पूर्ण केले जाईल. ज्या गावांमध्ये आशा स्वयंसेविका नाहीत, तिथे स्वयंसेवी संस्थांमार्फत स्वयंसेवकांची नियुक्ती करून हिवताप सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. तसेच, पावसाळ्यापूर्वी डास प्रतिबंधक फवारणीचे काम 45 दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. फवारणीसाठी वापरल्या जाणार्या कीटकनाशक पावडरची गुणवत्ता तपासणी (बॅच नंबरनुसार) अनिवार्य करण्यात आली आहे.
मच्छरदाण्यांचा वापर आणि जनजागृती
आशा स्वयंसेविकांमार्फत नागरिकांना मच्छरदाण्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रोत्साहन भत्ता (अनुदान) उपलब्ध करून दिला जाईल. तसेच शाळा आणि समाजस्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृती मोहीम राबवण्यात येईल. ज्या भागात कीटकनाशकांना प्रतिरोध दिसून येत आहे, तिथे नवीन प्रभावी कीटकनाशकांचा वापर करण्याबाबत तांत्रिक अभ्यास करून तरतूद करण्यात येईल. डासांची घनता कमी करण्यासाठी ‘सोर्स रिडक्शन’वर भर दिला जाणार आहे.