आरमोरी,
Ramdas Masram इटियाडोह प्रकल्प हा आरमोरी व परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, पाणीवाटप करताना कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. शेतकर्यांना योग्य वेळी पाणी मिळावे, यासाठी नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी अधिकार्यांना दिले.
इटियाडोह प्रकल्पांतर्गत होणार्या पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी, पारदर्शक व सर्वसामान्यांना दिलासा देणारे व्हावे, या उद्देशाने इटियाडोह प्रकल्प कार्यालय आरमोरी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तसेच प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दुपारी 12 वाजता सुरू Ramdas Masram झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, भविष्यातील नियोजन, उन्हाळी हंगामातील पाण्याची मागणी तसेच सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या समन्वयावर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्पातील सध्याच्या पाणीसाठ्याची माहिती देत कालव्यांची देखभाल, गळती रोखण्यासाठी उपाययोजना तसेच अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्याबाबत माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.बैठकीदरम्यान विविध अधिकार्यांनी पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या, अडचणी व सूचना मांडल्या. आमदार मसराम यांनी सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत तातडीने योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे इटियाडोह पाणीपुरवठा नियोजनाला दिशा मिळून आगामी काळात शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीला कार्यकारी अभियंता मोहूर्ले, उपअभियंता डहाणे, उपअभियंता बनसोडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धनपाल मिसार, दिलीप घोडाम, नगरसेवक माणिक भोयर, नगरसेवक अक्षय बागडे, नगरसेविका मेघा मने, मेघराज बुराडे, मनोज सपाटे, संगीता मेश्राम, छगन हेडाऊ, चारुदत्त राऊत आदी उपस्थित होते.