धान खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करा, अन्यथा शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ!

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
गडचिरोली,
Rice Procurement Centers चामोर्शी तालुक्यातील धान खरेदी केंद्रांमधील गोदामे पूर्णपणे भरल्याचे कारण पुढे करून अनेक केंद्रे अचानक बंद करण्यात आल्याने हजारो धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरेदी केंद्रावर रांगा लावूनही धान विक्री न झाल्याने शेतकर्‍यांना आपले धान परत घेऊन जाण्याची वेळ येत असून, या प्रकारामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Rice Procurement Centers  
या गंभीर व शेतकरीविरोधी परिस्थितीवर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत प्रशासन व धान खरेदी केंद्रांच्या संचालकांना थेट इशारा दिला आहे. गोदामे फुल झाली असतील तर खरेदी केलेल्या धानाची तत्काळ उचल करण्यात का उशीर केला जातो व मिलिंग लवकर का केली जात नाही? जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोणते धान खरेदी केंद्र गोदाम फुल झाले आहेत, याची माहिती घेऊन सदर धान खरेदी केंद्रातील संचालकांना डिओची परवानगी का देत नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे धान खरेदी न करता त्यांना परत पाठवणे हा सरळसरळ अन्याय असल्याचे डॉ. होळी यांनी म्हटले आहे.
डॉ. होळी पुढे म्हणाले की, धान खरेदी केंद्रातील संचालकांनी वेळकाढूपणा न करता साठवलेल्या धानाची लवकरात लवकर डिओ करून गोदाम खाली करावे आणि तालुक्यातील उर्वरित शेतकर्‍यांची धान खरेदी तातडीने सुरू करावी. अन्यथा शेतकर्‍यांचा संयम सुटल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे म्हटले आहे.धान हे चामोर्शी तालुक्यातील शेतकर्‍यांचे मुख्य पीक असून, अनेक कुटुंबांचे संपूर्ण अर्थकारण याच पिकावर अवलंबून आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असताना, धान खरेदी केंद्रे बंद ठेवणे म्हणजे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील शेतकरी दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, प्रसाद गुमफलवार, अनिल प्रिसिंगलवार, दिलीप नैताम, समीर मशीद, प्रभास सरकार, शुभास किर्तूनिया, आमिर सरदार, निखिल किर्तूनिया, जगदीश रॉय, दशरथ सरकार, विनोद मल्लिक, उमेश सरकार, संजय सरकार, उत्पल बाढइ, तारक दास आदींनी डॉ. देवराव होळी यांच्या या आक्रमक भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शविला असून, धान खरेदी त्वरित सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आता प्रशासन आणि खरेदी केंद्र संचालक शेतकर्‍यांच्या या आक्रोशाची दखल घेतात का, की परिस्थिती अधिक चिघळू देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.