वॉशिंग्टन,
Trump thanks Iran.अमेरिका कधीही इराणवर हल्ला करू शकते, अशी चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक वेगळाच सूर लावला आहे. एका असामान्य निर्णयाचे कौतुक करत ट्रम्प यांनी इराणी सरकारचे सार्वजनिकरित्या आभार मानले आहेत. इराणमध्ये शेकडो राजकीय कैद्यांना देण्यात येणारी फाशी थांबवण्यात आल्याबद्दल त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की इराणमध्ये ८०० हून अधिक लोकांना फाशी देण्यात येणार होती, मात्र हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. “इराणने ८०० पेक्षा जास्त लोकांची फाशी थांबवली. हा निर्णय त्यांनी घेतला याबद्दल मला मोठा आदर आहे,” असे ट्रम्प म्हणाले. यानंतर त्यांनी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही याच मुद्द्याचा उल्लेख करत इराणचे “धन्यवाद” मानले.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हा सौम्य आणि सकारात्मक सूर काही दिवसांपूर्वीच्या त्यांच्या कठोर इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. याआधी ट्रम्प यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या व्यापक निदर्शनांदरम्यान जर सामूहिक हत्याकांड घडले, तर अमेरिका लष्करी कारवाई करू शकते, असे संकेत दिले होते. मात्र सध्या इराणमधील आंदोलन शांत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमेरिकेची मदत येत आहे असे त्यांनी पूर्वी दिलेले संकेत अद्याप लागू आहेत का, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी यावर थेट उत्तर देणे टाळले. “ते पाहूया, असे म्हणत त्यांनी विषयावर संभ्रम कायम ठेवला. तसेच अरब किंवा इस्रायली अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकल्याच्या आरोपांनाही त्यांनी नकार दिला. “मला कोणीही राजी केलेले नाही. मी स्वतःच हा निर्णय घेतला, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तथापि, इराणमध्ये फाशी थांबवण्यात आल्याची माहिती त्यांना नेमकी कुठून मिळाली, याबाबत ट्रम्प यांनी कोणताही स्रोत सांगितला नाही. त्यामुळे त्यांच्या विधानांमागील गुप्तचर माहिती आणि विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तरीही, संभाव्य लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा अनपेक्षित ‘धन्यवाद’ आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.