उज्जेन,
Virat at the feet of Mahakala भारत जिथेही क्रिकेट खेळतो, तिथे वेळ मिळाल्यास देवदर्शनाला प्राधान्य देण्याची परंपरा टीम इंडियामध्ये कायम आहे. सामना किंवा स्पर्धा एखाद्या तीर्थक्षेत्राजवळ होत असेल, तर भारतीय खेळाडू आवर्जून मंदिरात जाताना दिसतात. यापूर्वी नैनितालजवळील कैंची धाम येथे नीम करोली बाबा तसेच वृंदावनमधील प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पोहोचल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना १८ तारखेला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने उज्जैनमधील प्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. याच भेटीदरम्यान कपाळावर चंदनाचा लेप लावलेला विराट कोहली भगवान शिवाच्या दर्शनासाठी पोहोचला आणि “जय श्री महाकाल” चा जयघोष करताना दिसला. विराटसोबत कुलदीप यादवही महाकाल मंदिरातील भस्म आरतीमध्ये सहभागी झाला होता. दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

दर्शनानंतर कुलदीप यादव यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, संपूर्ण भारतीय संघ महाकालच्या दर्शनासाठी आला होता आणि हा अनुभव अत्यंत समाधान देणारा होता. महाकालचे दर्शन केल्यावर मनाला शांती मिळते, असे सांगत त्यांनी देवाचे आशीर्वाद संघावर कायम राहावेत आणि क्रिकेट तसेच आयुष्यात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, अशी प्रार्थना केल्याचे नमूद केले. महाकाल सर्वांना आनंद, शांती आणि सुख देवो, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, तिसऱ्या सामन्यासाठी इंदूरला पोहोचल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही उज्जैनमध्ये जाऊन महाकालेश्वराचे दर्शन घेतले. राजकोटमध्ये शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेणारा केएल राहुलही महाकाल मंदिरात दिसून आला. यावरून संपूर्ण भारतीय संघ हा श्रद्धाळू खेळाडूंचा संघ असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. खरं तर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे विविध तीर्थस्थळांवरील फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर ते एमएस धोनी यांसारख्या दिग्गजांनीही आपल्या कारकिर्दीत देवदर्शनाला महत्त्व दिले आहे. महाकालेश्वर मंदिरातील विराट कोहलीचा “जय श्री महाकाल”चा जयघोष सध्या चाहत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.