वर्धा,
bor-tiger-reserve-buffer-safari : जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालते. या प्रकल्पाच्या ‘कोअर’ प्रमाणेच ‘बफर’ क्षेत्रातही पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद लुटता यावा या उद्देशाने सफारी ट्रॅक तयार करण्यात आला आहे. बोरच्या बफर सफरीचा श्रीगणेशा रविवार १८ रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे.
बफर क्षेत्रात जंगल सफारीमुळे या क्षेत्रातील सुमारे २४ गावांमधील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राच्या जंगल सफारीचा आनंद अनेक व्हीव्हीआयपी, राज्यातील तसेच राज्याबाहेरील पर्यटकांनी लुटला आहे. तर आता बोरच्या बफर क्षेत्राच्या जंगल सफारीचा आनंदही वन्यजीव, निसर्गप्रेमींसह बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सुमारे ४० किमीच्या जंगल सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. त्यासाठी वन्यजीव विभागाच्या बांगडापूर परिक्षेत्रातील ढगा तर हिंगणी वन परिक्षेत्रातील रहाटी येथे प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही गेटमधून प्रत्येक दिवशी पर्यटकांसाठी १५ वाहने जंगल सफारीसाठी सोडण्यात येणार आहेत.
यावेळी खा. अमर काळे, आ. दादाराव केचे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) श्रीलक्ष्मी ए., पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक अक्षय गजभीये, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरविर सिंग आदींची उपस्थिती होती.