देशभक्ती व समर्पणाचे दुसरे नाव भारतीय सेना : तडस

* देवळी येथे भारतीय सेना दिवस

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
देवळी,
ramdas-tadas : देशाला सुरक्षित ठेवण्याचे काम केवळ सैन्य दलाचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचेसुद्धा आहे. याकरिता आजच्या तरुणाईवर चांगले संस्कार रुजविणे काळाची गरज आहे. सैन्य दलाचे प्रशिक्षण एवढे खडतर असते की ज्यातून साहसी, निर्भीड, समर्पित व देशाकरीता सर्वकाही या मानसिकतेचा सैनिक तयार होत असतो. म्हणजेच देशभक्ती व समर्पणाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय सेना दल होय, असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी केले. भारतीय सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसीअंतर्गत स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील एनसीसी विभागातर्फे महाविद्यालयाच्या एनसीसी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
 

jkl 
 
प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदचे गटनेते उमेश कामडी, सदस्य रवींद्र कारोटकर व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते. यावेळी सैनिकांच्या जीवनावर पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. यात कॅडेट साक्षी पारीसे, राधिका नागोसे व दर्शना कदम यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिके तर कॅडेट युवराज डफरे व पायल चौके यांना प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
यावेळी शहीद स्मृतीला पुष्पचक्र प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी करून भारतीय सेनेचा इतिहास यावेळी सांगितला. अंडर ऑफिसर मयुरी पेटकर, अंडर ऑफिसर रितेश बुटे व सौरभ साव यांनी सेनादिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. संचालन कॅडेट आरती मरघडे तर आभार कॅडेट सार्जंट मेजर कल्याणी लिखार हिने मानले