स्वामी विवेकानंद स्मारक अनावरण

सोहळ्यात युवकांना प्रेरणादायी संदेश

    दिनांक :17-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भव्य अनावरण सोहळ्याप्रसंगी केंद्र सरकारच्या युवा व खेल मंत्रालयाचे संचालक डॉ. संदीप राठोड यांनी उपस्थित युवक व नागरिकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
 
 
 
 
 
y17Jan-Anavaran
 
 
 
स्वामी विवेकानंदांचे विचार आजही युवकांसाठी तितकेच मार्गदर्शक व प्रेरणादायी असून, ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त केल्याशिवाय स्वस्थ बसू नका’ असा संदेश प्रत्येक युवकाने आपल्या जीवनात अंगीकारावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मीना यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच स्वामी विष्णूपादानंद महाराज, स्वामी ओंकारेषानंद महाराज, स्वामी चेतनात्मानंद महाराज यांच्या पावन उपस्थितीमुळे सोहळ्याचे आध्यात्मिक वातावरण अधिकच उंचावले.
 
 
डॉ. संदीप राठोड युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती, चारित्र्य, संयम आणि सेवाभाव यावर आधारित आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षण नव्हे तर शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सबलता, सकारात्मक दृष्टीकोन आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार जीवनात उतरविल्यास युवक निश्चितच यशस्वी होतील व देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी डॉ. टी.सी. राठोड, एल.एच. पवार तसेच धुळे येथील वैद्य प्रवीण जोशी यांचीही उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी मूल्याधिष्ठित व राष्ट्रसेवेसाठी समर्पित जीवन जगावे, असे आवाहन केले.
 
 
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. स्वामी विवेकानंद स्मारक हे केवळ एक स्मारक नसून, युवकांसाठी प्रेरणाकेंद्र व मूल्यसंस्कारांचे शक्तिस्थान ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.