नागपूर,
Kishori Vikas “मातृभूमी गान से गुंजता रहे गगन…” या प्रेरणादायी वातावरणात किशोरी विकास नागपूर महानगर अंतर्गत १६ किशोरी केंद्रातील किशोरींचे वार्षिक स्नेह संमेलन सेवा सदन शाळेतील विमला जठार सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारत माता पूजनाने झाली. किशोरी विकास नागपूर महानगर प्रमुख कविता उराडे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुचिता इंगळे (एम.डी. पॅथॉलॉजी, LAD महाविद्यालय), डॉ. दिलीप गुप्ता (अध्यक्ष, लोककल्याण समिती) व डॉ. नंदश्री भुरे (विदर्भ प्रांत प्रमुख) उपस्थित होते.

डॉ. दिलीप गुप्ता यांनी संस्कार, स्वदेशी व नागरिक कर्तव्यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. सुचिता इंगळे यांनी किशोरींच्या मानसिक व शारीरिक बदलांवर संवादात्मक सत्र घेतले. त्यानंतर विविध केंद्रांच्या किशोरींनी सूर्यनमस्कार, कराटे, महिला सशक्तीकरण, पर्यावरण, सामाजिक माध्यमे, लोकनृत्य, पथनाट्य व एकपात्री प्रयोग अशा प्रभावी सादरीकरणांद्वारे जनजागृती केली. डॉ. अंजली देशपांडे (आरोग्य भारती) यांनी आहारविषयक मार्गदर्शन केले. पंचसूत्री विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. Kishori Vikas समारोप सत्रात वृषाली पुणेकर यांनी शताब्दी वर्षात पंचसूत्री अंगीकाराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा मुनीश्वर व धनश्री देव यांनी केले, तर आभार प्रदर्शन धनश्री देव यांनी केले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र