अमरावतीच्या लेकीचा ठाणे महापालिकेत विजय

    दिनांक :18-Jan-2026
Total Views |
माधुरी मेटांगे खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी
 
अमरावती, 
राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी Madhuri Metange-Bonde माधुरी मेटांगे-बोंडे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या ठाणे शहर जिल्हा सचिव पदावर कार्यरत असलेल्या माधुरी मेटांगे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग १२ (ब) मधून नगरसेवक पदी निवडून आल्याने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी मायबाप मतदारांचे आभार मानत जनकल्याणाचं व्रत असंच पुढे घेऊन जाणार असल्याचेही स्पष्ट केलं. माधुरी मेटांगे या ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध सामाजिक आणि राजकीय पदावर कार्यरत होत्या. त्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली.
 

metange 
 
Madhuri Metange-Bonde  खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी असलेल्या माधुरी मेटांगे यांनी वडील सुखदेवराव बोंडे, आई त्रिवेणी बोंडे यांच्या पावलावर पाऊल टाकत ज्ञानदानाचा कार्य हाती घेतलं. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या मेटांगे या दोन दशकांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. ठाणे शहर जिल्ह्याच्या सरचिटणीस, सचिव यासह विविध पदावर त्यांनी आपल्या कर्तृंत्वाने छाप सोडलेली आहे. सामाजिक संस्था, आदिवासी महिलांना रोजगार, महिला मुलींच्या सामाजिक प्रश्नांची जाण, त्या सोडवण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा, दीर्घकालीन उपाय योजना राबवून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं कार्य केलं. गोरगरीब मुला - मुलींना शालेय साहित्याचा वितरण करणे यासह विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन मेटांगे यांनी थेट पब्लिक कनेक्टवर भर दिला. नारी तू नारायणी, अनुलोम अनूगामी, लोकराज्य महाभियान, उत्सव स्त्रीशक्तीचा, हिंदू जागृती न्यास अशा विविध सामाजिक स्तरावर काम करून त्यांना वेगवेगळे सन्मान देखील मिळाले आहेत. यासह त्यांच्या विविध सामाजिक कार्याची दखल घेत भाजपकडून त्यांना ठाणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ (ब) मधून उमेदवारी देण्यात आली होती.
 
 
 
मूळच्या अमरावतीकर असलेल्या माधुरी मेटांगे यांनी भाजपने आपल्यावर दाखवलेल्या विश्वाला सार्थक ठरवत विजय मिळवला आहे. या विजयाचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मतदार, भाजपच्या पदाधिकार्‍यांना देतं मायबाप जनतेचे आभार मानले आहेत. नागरिकांनी जनकल्याणाच, लोककल्याणाचे व्रत पुढे घेऊन जाण्याची मला जी संधी दिली, त्या संधीच मी पुढच्या काळात सोनं करेल, प्रभागाचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल, यासाठी देखील आपण कार्यरत राहू अशी ग्वाही सुद्धा माधुरी मेटांगे यांनी दिली.