मंगरुळनाथ,
Raktadan importance, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन आमदार श्याम खोडे यांनी केले. जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान, नाणीजधाम यांच्या वतीने आज, १८ जानेवारी रोजी मंगरुळनाथ येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात २८ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. आ. खोडे पुढे म्हणाले की, मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल आहे, परंतु ज्या दानाने कोणाचे आयुष्य वाचते ते ’रक्तदान’ सर्वश्रेष्ठ पुण्यदान ठरते. अपघातग्रस्त रुग्ण, गर्भवती माता, थॅलेसेमिया रुग्ण व गंभीर आजारांवरील उपचारासाठी रक्ताचा तुटवडा भासू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत रक्ताची गरज वाढत असून, प्रत्येक सुजाण नागरिकाने यासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. यावेळी जिल्हा निरीक्षक अविनाश देशमुख, वाशीम तालुका अध्यक्ष भानुदास शिरसाठ, मानोरा तालुका अध्यक्ष राजू ठाकरे, युवासेना जिल्हा अध्यक्ष विशाल सोळके, जयेंद्र ठोंबरे, कारंजा तालुक अध्यक्ष संजय पुरी, नितेश मोहोकार, सरपंच संतोष घोडके यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सचिव शिवाजी पंजई, चंदाताई सूर्वे यांनी अथक परिश्रम घेतले. शासकीय रक्तसंक्रमण केंद्र वाशीमचे डॉ. धीरज जुमडे, डॉ. संदेश नेमाडे, डॉ. मंगेश पायघन यांच्यासह सचिन दंडे, एस. एस. स्वामी, दत्ताजी कांगणे, मोहीत भोयर, वैभव थोरात, सुनील सावके, नरेंद्र सांगळे, राहुल कष्टे, सागर मुळे व महादेव भोयर यांच्या चमूने रक्त संकलनाचे काम पाहिले.