झ्युरिक,
Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी पाच दिवसांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे आगमन झाले. यावेळी परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा, ओवाळणी आणि महाराष्ट्र राज्यगीताच्या सुरांनी मुख्यमंत्र्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रेमळ स्वागताबद्दल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मराठीजनांचे मनापासून आभार मानले.
झ्युरिक आणि दावोस येथे आगमन होताच स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही त्यांची भेट घेत नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांतील यशाबद्दल अभिनंदन केले. मार्गात भेटणाऱ्या अनेक नागरिकांनीही या दणदणीत विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘स्वागत देवाभाऊ’ असा फलक विशेष आकर्षण ठरला.
‘बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड’तर्फे झालेल्या स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्यात महा-एनआरआय फोरमच्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक वैभव जपले तरच भौतिक प्रगती शक्य होते, असे नमूद करत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी पुढील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय राजधानींनाही मागे टाकेल असे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट केले. जगभर मराठी माणूस मेहनती आणि विश्वासार्ह म्हणून ओळखला जातो, याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषा वर्ग सुरू करण्याच्या उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.