आश्रमशाळेच्या लेकींनी गाठले ‘ट्रायबल खेलो इंडिया’चे व्यासपीठ

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
साक्षी, अल्का यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मुल्ला(देवरी), 
दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थिनीही राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात झळकू शकतात, याचे जिवंत उदाहरण गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेतील दोन विद्यार्थिनींनी घालून दिले आहे. बीजेपार व कोयलारी येथील आश्रम शाळेतील साक्षी संजय पंधरे व अल्का रामदास मरसकोल्हे या विद्यार्थिनींची छत्तीसगड येथे होणार्‍या पहिल्या Tribal Khelo India Tournament ट्रायबल खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
 
 
sakshi
 
Tribal Khelo India Tournament  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचण्यांमध्ये साक्षी व अल्का यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. धनुर्विद्या प्रकारात कोयलारी येथील शासकीय आश्रम शाळेची साक्षी पंधरे हिने रिकर्व राउंड गटात तृतीय क्रमांक, तर बीजेपार येथील आश्रम शाळेच्या अल्का मरसकोल्हे हिने 800 मीटर धाव स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या कामगीरीने दोघीही छत्तीसगढ येथे येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या पहिल्या ट्रायबल खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचे प्रतिनिनित्व करतील. या यशामागे ‘एक आश्रमशाळा - एक खेळ’ या सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी, सातत्यपूर्ण क्रीडा प्रशिक्षण, संतुलित आहार आणि क्रीडा प्रशिक्षकांची नियमित उपलब्धता कारणीभूत ठरली आहे. बीजेपारचे मुख्याध्यापक अशोक इस्कापे व कोयलारीचे मुख्याध्यापक सदानंद भुरे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. साक्षी व अल्काने त्यांच्या यशाचे श्रेय आईवडील, प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, क्रीडा प्रशिक्षक व शिक्षकांना देत आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही उत्तम कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आदिवासी भागातील मुलींची ही क्रीडा भरारी जिल्ह्यासह राज्यातील नवोदित खेळाडूंना नवी दिशा देणारी ठरत आहे.
 
 

दुर्गम व आदिवासी क्षेत्रातील मुलींची क्रीडा क्षेत्रातील ही कामगीरी इतरही विद्यार्थी, खेळाडूंसाठी प्रेरणादायी बाब आहे. आगामी स्पर्धेतही त्या उत्तम कामगरी करून जिल्हाचा नाव प्रकाशमान करतील अशी अपेक्षा यावेळी प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी तरुण भारतकडे व्यक्त केली.