नवी दिल्ली,
Earthquake tremors in Delhi दिल्लीमध्ये सोमवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी दिल्लीमध्ये भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र उत्तर दिल्ली परिसरात असून, ते जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
भूकंपाची तीव्रता कमी असल्याने मोठ्या स्वरूपाचे धक्के जाणवले नसले तरी काही भागांत लोकांना हलकी कंपने जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.