Ghatanji Municipal Council नगरपरिषदेत पार पडलेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे. नप अध्यक्षपद काँग्रेसकडे असताना, सहाही विषय समित्यांवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व प्रस्थापित केल्याने खरंच काँग्रेसवर अन्याय झाला का, असा थेट प्रश्न आता शहरातील सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत.
Ghatanji Municipal Council काँग्रेसकडे नप अध्यक्षपद असताना विषय समित्यांमध्ये निर्णायक स्थान न मिळाल्याने, ही लोकशाही प्रक्रियेतली राजकीय खेळी की सत्तेचा वापर, यावर तीव्र चर्चा सुरू आहे. नगरपरिषदेतील निर्णयप्रक्रियेचा कणा असलेल्या विषय समित्या भाजपाच्या ताब्यात गेल्यामुळे अध्यक्षाची भूमिका केवळ औपचारिक राहणार काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नप अध्यक्ष काँग्रेसचे तर सभापती भाजपाचे या विसंगत सत्ताकारणात दोन्ही पक्ष खरोखर एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी काम करतील का ? की राजकीय कुरघोड्यांमध्ये विकास बाजूला पडणार ? अस प्रश्न नागरिकांना पडला आहे. काहींच्या मते, सत्तेतील हा दुहेरीपणा पुढील काळात निर्णयांना विलंब, परस्पर आरोप-प्रत्यारोप आणि विकासकामांना खीळ घालणारा ठरू शकतो. तर दुसरीकडे, राजकीय अभ्यासकांच्या मते, जर दोन्ही पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून समन्वय साधला, तर शहराच्या विकासासाठी संधी ठरू शकते, मात्र तसे न झाल्यास नगरपरिषदेत संघर्षाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.