शिवनगावात ‘योजना कागदावर, तहान जमिनीवर’
सेलू,
Hingani Gram Panchayat water problem तालुयातील हिंगणी गटग्रामपंचायत अंतर्गत येणार्या शिवनगाव येथे जिल्हा परिषदेच्या हर घर जल योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी उभी आहे. रंगरंगोटी केलेली, उद्घाटनासाठी सज्ज असून पाणी कुठे आहे, असा प्रश्न सतत घुमतो आहे. ‘हर घर जल’सारखी महत्त्वाकांक्षी योजना गावात आली, टाकी बांधली गेली; पण घराघरांत पाणी पोहोचवण्याचा मूलभूत उद्देशच हरवला. योजना म्हणजे केवळ सिमेंट-लोखंड नव्हे, तर निरंतर सेवा. टाकी उभारून महिनो महिने उलटून गेले, तरी पाणीपुरवठा सुरू होत नसेल तर तो कारभाराचे अपयश नसून जबाबदारीचा पलायन ठरतो. प्रशासनाने आकडेवारीत ‘काम पूर्ण’ दाखवले; प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थ आजही विहीर, बोअरवेल, टँकरवर अवलंबून आहे.
Hingani Gram Panchayat water problem महिलांची पायपीट, वृद्धांची कुचंबणा आणि विद्यार्थ्यांची गैरसोय याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्घाटनाचे फोटो, फलकांवरील घोषवाये आणि कागदावरील मंजुरी याने तहान भागत नाही. टाकी भरली नाही तर योजना अपूर्णच ठरते. जलस्त्रोत, पम्पिंग यंत्रणा, पाइपलाइन चाचणी, विद्युत जोडणी या सगळ्या टप्प्यांवर विलंब दिसून येत आहे. निधी खर्च झाला, पण परिणाम शून्य हे चित्र लोकशाहीला शोभणारे नाही, असा सूरही आवळला जात आहे. आज शिवनगावात टाकी उभी आहे, पण पाण्याचा ठणठणाट आहे. आता उन्हाळ्याला सुरूवात होणार आहे. या काळात पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागते. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कालमर्यादा जाहीर करावी, जबाबदारांवर कारवाई करावी आणि पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा. अन्यथा ‘हर घर जल’ हा नारा रिकाम्या टाकीसारखाच ठरेल. टाकी उभी करून श्रेय घेण्याचा काळ संपला आहे. आता पाणी द्या नाहीतर प्रश्न अधिक तीव्र होईल, असा इशाराही गावकर्यांनी दिला आहे.