बेकायदेशीर अवजड वाहनांचा धुमाकूळ

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
अपघात घडल्यास जबाबदार कोण?
सितेपारवासीयांची कारवाई करण्याची मागणी

आमगाव, 
Illegal heavy vehicles तालुक्यातील सितेपार ग्राम पंचायत हद्दिसह परिसरातून सुरू असलेल्या बेकायदेशीर व भरधाव अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः धोक्यात आले असून, प्रशासन मात्र अद्याप गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे. या बेकायदेशिर क्षमतेपेक्षा अधिक भाराने मालाची वाहतुक करणार्‍या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी सितेपार ग्रामपंचायतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांना दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे.
 
 
Vahan
 
सितेपार येथील क्रेशर लघुउद्योगातून निघणारी गिट्टी, बदरी व मलमा ही सामग्री नियमबाह्य पद्धतीने रात्रंदिवस गावातून वाहून नेली जात आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत बांधलेले अरुंद रस्ते केवळ 10 टन वहनक्षमतेचे असताना, तब्बल 50 ते 60 टन वजन असलेल्या दगड, गिट्टी, बदरी, मुरूम, मलमा आदीची बिनधास्तपणे वाहतुक सुरू आहे. परिणामी गाव परिसरातील रस्ते उद्ध्वस्त झाले असून भरधाव टिप्परमधून गिट्टी रस्त्यावर सांडत आहे. उघड्या मलम्यामुळे धुळीचे लोट हवेत उडत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिस्थितीमुळे अपघात होणे नित्याचे झाले असून, लहान मुलांना शाळेत जाणेही जीवावर बेतले आहे. रस्त्यावरून चालणे, वाहणे चालविणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. भरधाव वाहतुकीमुळे संपूर्ण गाव भीतीच्या सावटाखाली आहे. तरीही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. Illegal heavy vehicles नियमबाह्य जड वाहनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही आरटीओंना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा ठाम इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, पोलिस निरिक्षक, तहसीलदार आमगाव यांना प्रेषित करण्यात आल्या आहेत.