Kidney racket नागभीड येथील मिंथूर या लहानश्या गावातील शेतकरी रोशन कुळे यांच्यापासून सुरूवात झालेले किडनी विक्री प्रकरणाचे जाळे आता अवघ्या जगात पसरले असल्याचे पुढे येत आहे. आधी कंबोडियात काही पीडितांची शस्त्रक्रिया करून किडनी काढल्याचे ‘एसआयटी’च्या तपासात पुढे आले. तर आता इराणमध्येही किडनी काढून विकल्या गेल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तामिळनाडू येथील त्रिचीच्या स्टॉर किम्स रूग्णालयात किडनी काढलेले तीन आणखी पिडित सापडले असून, त्यांचे बयाण ‘एसआयटी’ने नोंदवले आहे.
पीडित रोशन कुळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर Kidney racket किडनी रॅकेटचा मुख्य दलाल रामकृष्ण सुंचू उर्फ ‘डॉ. कृष्णा’ यास सोलापुरातून अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून मोहालीतील आरोपी हिमांशू भारद्वाज यास ताब्यात घेण्यात आले. हिमांशूची किडनी त्रिची येथील स्टॉर किम्स रुग्णालयात काढल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ‘एसआयटी’कडून आणखी काही पीडितांचा शोध सुरू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील तारिकचीही किडनी त्रिचीत काढल्याचे स्पष्ट झाले. याच रुग्णालयात आता पुन्हा उत्तर भारतातील तिघांची किडनी काढल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याचीही विलक्षण कहानी आहे जी लवकरच पुढे येईल, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
Kidney racket काही दिवसांपूर्वीच ‘एसआयटी’ने या तिघांचेही बयान नोंदविले आहे. त्यामुळे आता त्रिचीत शस्त्रक्रिया झालेले पाच पीडित संपर्कात असून, त्यांच्या माध्यमातून अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंग आणि तामिळनाडूतील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शिवाय किडनी घेणार्यांच्याही शोधात पोलिस असताना कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधील एकाची माहिती पुढे आली होती. त्याच्या शोधात पोलिसांचे पथक असताना दोन महिन्यांपूर्वीच त्या ‘रिसीव्हर’चा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली. आता त्याच्या कुटुंबातील सदस्यांकडूनही याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने पोलिस सुत्रांनी सांगितले.