दरभंगा,
Narrator Shravan Das Maharaj arrested बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीशी संबंधित लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात कथाकार श्रवण दास महाराज यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणातील त्यांचा गुरु मौनी बाबा सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरभंगा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) जगुनाथ रेड्डी यांनी याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.

एसएसपी जगुनाथ रेड्डी यांनी सांगितले की, मिथिलातील कथाकार म्हणून ओळख असलेल्या श्रवण दास महाराज यांच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात एसडीपीओ राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे महिला पोलीस ठाणे, लहेरियासराय पोलीस ठाणे आणि परिसरातील इतर पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने हाऊसिंग बोर्ड कॉलनीतून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रवण दास महाराज यांचा साथीदार आणि गुरु मौनी बाबा सध्या फरार असून, या संपूर्ण प्रकरणातील त्यांची भूमिका काय आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. पोलिस पथके विविध ठिकाणी छापे टाकत असून, लवकरच मौनी बाबालाही अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
श्रवण दास महाराज यांचे खरे नाव श्रवण ठाकूर असून, ते दरभंगा जिल्ह्यातील बिरौल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पर्री गावचे रहिवासी आहेत. ते सध्या लहेरियासराय पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पचधी छावणी येथील राम जानकी मंदिरात वास्तव्यास होते. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेशी जवळपास एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेचा आरोप आहे की, ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबावही टाकण्यात आला.
या प्रकरणात पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली असून, तिच्या निवेदनाच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व पैलूंची बारकाईने चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, धार्मिक प्रवचन करणाऱ्या व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी आसाराम बापू, गुरमीत राम रहीम, फलाहारी बाबा आणि स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांच्यावरही अशाच स्वरूपाचे गंभीर आरोप झाले होते. यापैकी काहींना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली असून, काही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर दरभंगातील हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.