नवी दिल्ली,
Nitin Nabin for the post of National President भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन आज, सोमवार १९ जानेवारी रोजी, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन नबीन दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर ४ ते ५ दरम्यान उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल आणि ५ ते ६ दरम्यान उमेदवारी माघार घेता येईल.
माहितीनुसार, भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक २० जानेवारी रोजी होणार आहे. या दिवशी नवीन अध्यक्षाचे नाव जाहीर केले जाणार आहे. या कार्यक्रमात पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी एकूण ५,७०८ मतदार मतदान करतील. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अनेक उच्चपदस्थ नेते यादीत आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीत ३० राज्यांमधून निवडून आलेले ५,७०८ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रीय परिषद आणि राज्य परिषदांमधील नेत्यांची नावे आहेत. राष्ट्रीय परिषदेच्या संसदीय पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांसह ३५ सदस्यांचा समावेश आहे. नितीन नबिन हे बिहारमधून पाच वेळा आमदार राहिले आहेत. १५ डिसेंबर रोजी त्यांची भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. ४६ वर्षांचे नबिन भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी स्वतःला पक्षासाठी समर्पित नेते म्हणून स्थापित केले असून, त्यांच्या नियुक्तीला पक्षात महत्त्वपूर्ण बदलाचे चिन्ह मानले जात आहे.