भीती आणि भावनांचे राजकारण

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
 
owaisis party ओवैसींच्या पक्षाला महाराष्ट्रात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. पूर्वी एका मालेगावमध्येच मुस्लिम विचारांच्या पक्षाची अधिकृत जागा यायची. पूर्वी मुसलमानांचे एकगठ्ठा मतदान हे काँग्रेसकडे जायचे. परंतु आता ओवैसींचा एमआयएम हा पक्ष सर्वत्र आपली विजयी घोडदौड करताना दिसून येत आहे. जो पक्ष एका व्यक्तीभोवती फिरणारा आहे, ज्याने आपल्या जाहीरनाम्यात विकासाची कोणतीही आश्वासने दिलेली नव्हती. ज्याने रस्ते, पाणी, ऊर्जा, शिक्षण याबद्दल कोणतीही आश्वासने दिलेली नव्हती. तो पक्ष केवळ मुस्लिम मतांच्या भरवशावर सर्वत्र चांगली कामगिरी करीत आहे, असे दिसत आहे. पूर्वी कधीकाळी काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजाला भाजपा-संघ यांची भीती दाखवत होता. यांच्याबद्दल ते मुस्लिम समाजाला सांगायचे की, हे लोक तुम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवून देतील. त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जायची. त्या भीतीचे राजकारण केले जायचे.
 
 

ओवैसीस पार्टी  
 
 
 
आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ओवैसीने आपला पक्ष स्थापन केला आणि पाहता पाहता ते देशातल्या विविध राज्यांमध्ये आपली पकड बनवीत चालले आहेत. देशाचे विभाजन झाले त्या वेळेला मुस्लिम लीग हा एक मुसलमानांचा प्रमुख पक्ष होता. त्याने मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली. इंग्रजांच्या सहकार्याने ती मागणी पूर्ण सुद्धा झाली आणि पाकिस्तान नावाचे एक मुस्लिम राष्ट्र जगाच्या रंगमंचावर अवतीर्ण झाले. धर्माच्या आधारावर राजकारण करून पहिले सत्ता प्राप्त करायची आणि त्यानंतर वेगळा देश मागायचा, असा मुस्लिम लीगचा इतिहास राहिलेला आहे. ओवैसींचा पक्ष त्या मार्गावर जाईल, असे सांगता येत नाही. परंतु त्याने भीती आणि भावनांच्या आधारावर राजकारण करायचे आहे, हे मात्र ठरवलेले दिसते. नागपूरसारख्या ठिकाणी ओवैसींच्या पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत. मुस्लिमबहुल भागामध्ये त्यांनी मुस्लिम उमेदवार दिले. एका विशिष्ट जाती-धर्माला मानणाèया वस्तीमध्ये त्यांनी त्या विशिष्ट जाती-धर्माला मानणाèया लोकांना प्रतिनिधित्व दिले. त्याचा परिणाम असा झाला की, मुस्लिमबहुल वस्तीमध्ये मुसलमानांची एकगठ्ठा मते ओवैसींच्या पक्षाला मिळाली आणि त्याचबरोबर एका विशिष्ट जातीची मते सुद्धा त्यांना मिळाली. त्यामुळे नागपूरमध्ये एका प्रभागात भाजपाच्या उमेदवारांना असलेले तीन हजारांचे आधिक्य सुद्धा त्यांनी मोडून काढले आणि आपला विजय नोंदविला.ओवेैसींचा पक्ष मुसलमान आणि एक विशिष्ट जात यांना घेऊन भविष्यातील राजकारण करू शकतो, असे संकेत त्यांनी सर्वत्र दिलेले आहेत. त्यामुळे येणाèया काळामध्ये जिथे या विशिष्ट जातीचे लोक अधिक आहेत, तिथे मुस्लिम समाज त्यांना मतदान करू शकतो आणि जिथे मुस्लिम समाज अधिक आहे, तिथे या विशिष्ट जातीचे लोक त्यांना मतदान करू शकतात, अशी परिस्थिती भावी काळामध्ये निर्माण होऊ शकते. नागपूरमध्ये मुस्लिम लीगचे सुद्धा चार उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणजे भीती आणि भावनांचे राजकारण करणाèया पक्षाच्या विजयी उमेदवारांची संख्या नागपूर महानगरपालिकेत दहा झालेली आहे. यांचे पक्ष किती मुस्लिम लोकांना रोजगार मिळवून देतील? किती दवाखाने उभे करतील? हे लोक विकासाची किती कामे करतील? हे सांगता येत नाही. त्यांचा समाज सुद्धा त्यांना हे विचारणार नाही, कारण त्यांच्या समाजाने आणि एका विशिष्ट जातीने केलेले मतदान हे धर्माच्या आधारावर केलेले आहे.
एकेकाळी भाजपा राम मंदिराच्या आंदोलनाच्या वेळेला, ज्या वेळेला हिंदुत्वाच्या मुद्यावर लोकांना मतदानाचे आवाहन करीत होता, त्यावेळेस काँग्रेस, पुरोगामी आणि इतर सर्वच लोक धर्माच्या नावावर राजकारण करू नका, विकासाच्या मुद्यावर राजकारण करा, असा सल्ला त्यांना देत होते. धर्माच्या आधारावर राजकारण करू नका, असे सांगणारी काँग्रेस आणि इतर पक्ष हे दिल्लीच्या जामा मशीदमध्ये शाही इमाम यांच्यासमोर आपला माथा टेकवायला जात होते. त्यांच्या या मुस्लिम अनुनयाला भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्याने उत्तर दिले होते. परंतु भीती आणि भावनांचे राजकारण हे फार काळ साथ देत नाही, अशा पद्धतीचा त्यांना साक्षात्कार झाल्याने ते विकासाच्या मागे लागले व आताच्या निवडणुका ते विकासाच्या मुद्यावर लढवत आहेत. परंतु विरोधी पक्ष मात्र अजूनही जाती-पातीच्या भावनांच्या आधारावर निवडणूक लढवीत आहेत, असे सर्वत्र दिसून येते. विविध जातींच्या आरक्षणासाठी उभी झालेली आंदोलने आणि त्यातून निर्माण झालेले नेते हे त्यांचे प्रतीक आहेत.
मुंबईमध्ये ठाकरे बंधूसुद्धा मराठीच्या नावावर एकत्र आले. जेव्हा त्यांना सत्ता मिळाली, त्यावेळेस ते विकास करून दाखवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याजवळ विकासाचा मुद्दा नव्हता. त्यामुळे आता हीच शेवटची वेळ आहे, अशा पद्धतीची भावनिक हाक मराठी मतदारांना मुंबईत देऊन त्यांनी आपले अस्तित्व वाचविण्याचा प्रयत्न केला. मराठी मतदारांनी ठाकरे बंधूंना बहुसंख्येने मतदान केले. परंतु याच्याच विरोधात मुंबईतील सर्व अमराठी लोकांनी भाजपाचा पर्याय स्वीकारला. परंतु मुंबईकर जनतेला त्यांच्या दैनंदिन हाल अपेष्टांपासून मुक्ती देत विकास घडवून आणण्याचे कसब केंद्र, राज्य आणि आता महानगरपालिकेत सत्ता असलेला भाजप करून दाखवू शकतो, हे मुंबईकर जनतेने लक्षात घेतले पाहिजे. परंतु ते याही वेळेस मराठीच्या म्हणजे भावनेच्या मुद्यावर आधारित राजकारणाला बळी पडलेले दिसून आले आहे.
थोडक्यात काय? भाजप जेव्हा भावनेचे राजकारण करीत होता, त्यावेळेस हे सर्व पक्ष भाजपला विकासाच्या गोष्टी सांगत होते. आज भाजप विकासाच्या गोष्टी करत आहे, तर उर्वरित सर्व पक्ष भीती आणि भावनेची तुतारी वाजवीत आहेत. लोकांची पण कमाल आहे की, लोक अशा पक्षांना मतदान करताना त्यांना आलू-कांद्याचे भाव कसे वाढले आहेत, तेल कसे महाग झाले आहे, पेट्रोल कसे महाग झाले आहे, या गोष्टी विचारत नाहीत.owaisis party त्यावेळेस त्यांना आपली जात, आपला धर्म आठवतो. आणि केंद्र सरकारची निवडणूक आली की महागाई किती वाढली आहे, बेरोजगारी तुम्ही किती कमी केली, असे प्रश्न ते विचारतात. वास्तविक हे लक्षात घेतले पाहिजे की, जनता जर धार्मिक मुद्यांवर, जातीच्या मुद्यांवर मतदान करत असेल, तर सत्तापक्ष बेरोजगारी, विकास यांची चिंता सोडून तोही भीती आणि भावनेच्या भरवशावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे ठाकरे बंधूंना मतदान करणारे लोक असो किंवा ओवैसीच्या पक्षाला मतदान करणारे लोक असो, त्यांनी एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर तरी लोकशाही प्रगल्भ झाली पाहिजे. त्यासाठी जनता सुज्ञ झाली पाहिजे. यासाठी समाजातील विचारवंत, सामाजिक संस्था या सर्वांनीच लोकजागृती, समाजजागृती करण्याची आवश्यकता आहे. असे न झाल्यास दिल्लीतील आणि गल्लीतील निवडणुका एकाच मुद्यावर लढल्या जाऊन जनतेला मूळ प्रश्नांचा, विकासाचा विसर पडेल. धर्म आणि जातीच्या राजकारणाला जर यश आले, तर ज्यांनी विकास केला आहे, त्यांच्या केलेल्या विकासावर धर्मांध स्वार होतील, त्याचा उपभोग घेतील आणि विकास करणारे मात्र सत्तेबाहेर राहतील. असे होऊ नये म्हणून सुज्ञ आणि जागृत मतदार निर्मितीसाठी प्रयासांची आवश्यकता आहे.
अमोल पुसदकर