मोबाईल सोडा, आत्मघात टाळा!

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
 
वेध....
avoid suicide तंत्रज्ञान हे माणसाला जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नाही. मात्र प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाईल हा घातकच ठरला आहे. त्यामुळे लोक एकमेकांपासून तुटले आहेत. यावर तत्काळ उपाय न केल्यास युवा पिढी उद्ध्वस्त होईल अन् आपला देश महासत्ता सोडा शेवटच्या रांगेतही राहणार नाही. एवढी दाहकता यातून निर्माण होईल. आजच्या पिढीला लाईक्स म्हणजे प्रेम वाटते, तर कमेंटस् आल्यास आभाळ ठेंगणे वाटते. अशा मृगजळरूपी काल्पनिक विश्वात ते वावरत आहेत. याच विश्वातील मित्र जेव्हा एकमेकांना भेटतात, त्यावेळी प्रत्येकाच्या हाती मोबाईल असतो. ते एकमेकांसोबत न बोलता मोबाईलवरील चॅटिंगला प्राधान्य देतात. मग दोघे जण भेटायला का आले, असाच प्रश्न सहजतेने उपस्थित होतो. प्रत्येकाच्या फेसबुकवर पाच हजार मित्र असतात. इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेकडो ग्रुप्सवर बहुतांश युवक, युवती सक्रिय असतात. सर्वांनाच वाटते आपण खूप सामाजिक आहोत. पण ते शंभर टक्के मृगजळ आहे. रस्त्यावरचे मृगजळ माणसाची तहान भागवू शकत नाही, अगदी तद्वतच मोबाईलवरील हे हजारो मित्र कधीच मदतीला येत नाहीत. मग त्यांना मित्र का म्हणावे, असाही प्रश्न कुठल्याही सुज्ञ युवा पिढीच्या मनात आलेला नाही.
 

mobile use 
 
 
एका संशोधनानुसार, दिवसाला 2 तासांपेक्षा जास्त मोबाईल हाती धरून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या तरुणांमध्ये एकटेपणाची भावना 80 टक्के असते. ते तरुण हळूच नैराश्याकडे वळतात. त्यांना चिंता आणि निद्रानाशाची समस्या भेडसावते. प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळण्याची भीती वाटते. जी मुले मनमोकळेपणाने मित्रांमध्ये मिसळतात ते सुखात असतात. त्यांना पाहून या मुलांमध्ये असुरक्षितपणाची भावना वाढते. अभ्यासात मन लागत नाही. परिणामी ती हुशार असली तरी मोबाईलवरील वेडाने नापास होतात. मग त्यांना परीक्षेची भीती वाटते. आज मोबाईल माणसाच्या मानगुटीवर बसला असल्याची अनेक उदाहरणे जागोजागी सापडतात. शेकडो मुले-मुली तर रस्ता ओलांडताना मोबाईल कानाशी धरूनच समोर जातात. दुचाकी वाहन चालवितानाही त्यांचे सर्व लक्ष मोबाईलवर असते. एवढेच नव्हे तर नैसर्गिक विधी आणि भोजन करतानाही ते मोबाईलमध्ये गर्क असतात. माझ्या मते भारतीय मुलांना मोबाईलचे वेड लावणे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. कारण भारत हा युवकांच्या बळावरच महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे. या स्थितीत ही युवा पिढीच बर्बाद झाली तर भारत महासत्ता होणार नाही अन् विकसित देशांपुढचा धोका टळेल. यातून देशाला अन् पर्यायाने स्वत:ला सावरायचे झाल्यास दररोज 12 तास मोबाईल दूर ठेवावा लागेल. मित्रांसोबत मनमोकळेपणाने गप्पा माराव्या लागतील. आई-वडिलांशी संवाद साधून त्यांच्या मनातील घालमेल समजून घ्यावी लागेल. त्यांना दैनंदिन कार्यात मदत करावी लागेल. शक्य तेवढे मैदानी खेळ खेळावे लागतील. इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. आता हा मोबाईलसुद्धा इंग्रजांप्रमाणे नव्हे त्यांच्यापेक्षाही घातक आहे. हा जर मानगुटीवर बसला तर कुणीही यातून भारतीयांना बाहेर काढू शकणार नाही. पुन्हा या देशात स्वातंत्र्य युद्ध छेडावे लागेल. ते आता तातडीने पूर्णत्वास जाईल अशी आजची स्थिती नाही. कारण तेव्हाचे लोक देशभक्तीने ओतप्रोत होते. आज तर मोबाईलच्या नादापायी स्वत:चा स्वार्थही लोकांना कळत नसल्याने ते देशाचा विचारच करू शकणार नाही. अशा मोबाईलच्या चक्रव्यूहात सापडलेल्यांचा अभिमन्यू होणारच, हे तेवढेच खरे आहे. अभिमन्यू जिंकला नव्हता तर त्याला आत्मघाती मरण पत्करावे लागले होते, हे सदैव स्मरणात ठेवा. तसाच आत्मघात मोबाईल न सोडल्यास देशातील युवकांचा होईल. म्हणूनच वेळीच सावध होऊन युवकांना या चक्रव्यूहातून बाहेर पडावेच लागेल. आपण केलेल्या पोस्टला लाईक्स न मिळाल्यास मुले दु:खी होतात.avoid suicide हा मानसिक आजारच आहे. माणूस जेव्हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असतो, तेव्हाच त्याला निरोगी म्हटले जाते. मानसिक रोगाने पीडितांना आपण निरोगी का म्हणून म्हणावे? विशेष म्हणजे अशा लोकांचा देशालाही फायदा नसतो. ते तर खायला काळ अन् भुईला भारच असतात. याचा फटका देशाच्या विकासाला बसेल. भारत तरुणांचा असला तरी तो मानसिकदृष्ट्या कमकुवत लोकांचा गणला जाईल. अशी अवहेलना आपल्या भारताची होऊ नये असे वाटत असेल तर आजच मोबाईलचा नाद सोडा. शेवटी, ‘मोबाईल नव्हते तेव्हा माणूस माणसांत होता. गप्पांची मैफल सोबत हास्यकल्लोळ होता.’
अनिल उमाकांत फेकरीकर
9881717859