sandeep Joshi retires from active politics 'राजकारण ही माझ्यासाठी पद किंवा प्रतिष्ठेची नव्हे, तर समाजसेवेची वाट होती. मात्र आजचे बदललेले चित्र पाहता आता थांबणेच योग्य वाटते,' असे स्पष्ट शब्दांत सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नसून सखोल विचारांती घेतल्याचे त्यांनी आपल्या भावनिक पत्रातून स्पष्ट केले आहे. सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, वाढलेला संधीसाधूपणा आणि तीव्र झालेली स्पर्धा यामुळे सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता निर्माण होत असल्याचे संदीप जोशी यांनी नमूद केले.
मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीही थांबायला तयार नसल्याची वस्तुस्थिती स्वीकारत, अशा परिस्थितीत आपणच थांबावे, हा विचार मनात पक्का झाल्याचे त्यांनी सांगितले. आजही आपण स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, मात्र आता सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. वयाची ५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तरुण नेतृत्वाला संधी देणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करत, स्वतःची जागा रिक्त करणे ही काळाची गरज असल्याचे जोशी म्हणाले. पक्षाने आपल्याला घडवले, मोठे केले आणि अनेक संधी दिल्या, याची जाणीव ठेवून त्यांनी भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व खा. नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नम्रपणे माफी मागत हा निर्णय जाहीर केला.
संदीप जोशी यांची विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. तोपर्यंत आमदार म्हणून असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण जबाबदारीने पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १३ मेनंतर ते आमदारकीची कोणतीही मागणी करणार नाहीत, तसेच पक्षाने ती देऊ केली तरी नम्रपणे नकार देतील, असेही त्यांनी सांगितले. ती संधी एखाद्या तरुण किंवा सामान्य कार्यकर्त्याला अथवा पक्ष योग्य समजेल त्या व्यक्तीला द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. १३ मेनंतर आपण संपूर्णपणे सक्रिय राजकारणातून निवृत्त होणार असून, सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. समाजसेवा, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रम पुढेही अविरत सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात एकल पालकत्व नशिबी आलेल्या महिलांसाठी राबविण्यात आलेला ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, मोहगाव झिल्पी येथील गोसेवा प्रकल्प तसेच श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले विविध सामाजिक उपक्रम पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य ॲम्युचर हॉकी संघटना, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना, नागपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि खासदार क्रीडा महोत्सव अशा क्रीडा क्षेत्रातील जबाबदाऱ्या पार पाडत तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. आपल्या निर्णयामुळे कुटुंबीय, स्नेहीजन आणि पक्षाचे कार्यकर्ते व्यथित होतील, याची जाणीव असल्याचे सांगत त्यांनी सर्वांची मनापासून माफी मागितली. काळ कुणासाठी थांबत नाही. मात्र काही क्षण आपल्याला आतून हादरवतात आणि त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. इतरांना नाही, किमान स्वतःला न्याय देता आला, तरच जगणे अर्थपूर्ण ठरते,असा ठाम विश्वास व्यक्त करत संदीप जोशी यांनी आपल्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम दिला. कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्यावर संस्कार केले आणि भारतीय जनता पार्टीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि विधान परिषदेचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या देत सन्मानित केले, याबद्दल त्यांनी पक्ष आणि नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपण कायम ऋणी राहू, असेही स्पष्ट केले.