पालिका निकालांनी खवळले शिंदे!

पक्षात मोठे बदल करण्याची तयारी

    दिनांक :19-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Shinde is angry with election results पालिका निवडणुकांच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने शिंदे यांनी पक्षांतर्गत मोठे बदल करण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. मंत्र्यांची आणि आमदारांची कामगिरी समाधानकारक न ठरल्याने मंत्रिमंडळात ‘भाकरी फिरवण्याचे’ संकेत मिळत असून, अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मंत्री आणि आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. मात्र ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर वगळता बहुतांश ठिकाणी पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
 
Shinde is angry with election results
 
या पार्श्वभूमीवर जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीची शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्याचे सांगितले जाते. निवडणुकीपूर्वीच मंत्र्यांना सूचक इशारे देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुका या शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला असला, तरी अपेक्षित कामगिरी न झाल्याने मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळणार आणि कुणाला संधी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अकार्यक्षम मंत्र्यांकडील जबाबदाऱ्या काढून घेत नव्या आणि तरुण चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्याचा विचार शिंदे करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 
दरम्यान, मुंबईत नगरसेवकांची फाटाफूट होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे यांची धावाधाव सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा पालिकेतील गट आज स्थापन केला जाणार असून, त्यासाठीची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याचवेळी गटनेत्यांची निवड होण्याची शक्यता असून, यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले या तरुण व अनुभवी नगरसेवकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. वेळेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यास नगरसेवक फुटीचा धोका टाळता येईल, या उद्देशाने पक्षातील हालचालींना वेग आला आहे.
 
दुसरीकडे, जागावाटपावरूनही पक्षांतर्गत नाराजी उफाळून येत आहे. भाजपने प्रत्येक जागेचा मेरिटवर विचार करून शिवसेनेला केवळ ९० जागा दिल्याची चर्चा आहे. या जागा देतानाही भाजपने भविष्यातील राजकीय गणित लक्षात ठेवले असल्याचे बोलले जाते. याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी काही ठिकाणी घराणेशाहीचा विचार करत उमेदवारी दिल्याची टीका होत आहे. मात्र तुकाराम काते वगळता अनेक नेत्यांना आपल्या कुटुंबातील उमेदवार निवडून आणण्यात अपयश आले. माजी आमदार सदा सरवणकर यांची मुले, खासदार रविंद्र वायकर यांची मुलगी, राहुल शेवाळे यांची भावजय, आमदार अशोक पाटील आणि मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ऐन निवडणुकीत अशा उमेदवारांना तिकीट का देण्यात आले, असा सवाल स्थानिक कार्यकर्ते खासगीत उपस्थित करत आहेत. युतीतील जागावाटपाच्या चर्चांमध्ये शिंदेंना कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि अंबरनाथ या भागांपुरतेच मर्यादित ठेवण्यात आल्याचा आरोपही होत आहे. याचाच मोठा फटका मुंबईत पक्षाला बसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे कोणते मोठे आणि कठोर निर्णय घेतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.