महापालिकेसाठी ६६१ उमेदवार रिंगणात

१६१ उमेदवारांनी सोडले मैदान

    दिनांक :02-Jan-2026
Total Views |
अमरावती, 
amravati-news : महापालिकेच्या २२ प्रभागातील ८७ जागेसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांपौकी गेल्या दोन दिवसात १६१ उमेदवारांनी माघार घेतली. आता ६६१ उमेदवार रिंगणात राहीले आहे. सर्वाधिक ८५ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना व भाजपाचे उमेदवारांची संख्या आहे.
 
 
 K
 
 
 
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या दोन्ही गटासह वायएसपी, वंचित बहूजन आघाडी व एमआयएमचे उमेदवार रिंगणात असल्याने महापालिका निवडणुकीत बहूरंगी लढत होणार आहे. या सर्व पक्षांसह अपक्ष मिळून एकूण ८०९ उमेदवार कालपर्यंत रिंगणात होते. अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवार अखेरच्या दिवशी सातही झोनमधून १६१ उमेदवारांनी रणांगण सोडल्याने या रिंगणात आता ६६१ उमेदवार राहीले आहेत. झोन १ मध्ये येणार्‍या तीन प्रभागात ९७, झोन २ मध्ये येणार्‍या तीन प्रभागात १००, झोन ३ मध्ये येणार्‍या तीन प्रभागात ९४, झोन ४ मध्ये येणार्‍या तीन प्रभागात १०८, झोन ५ मध्ये येणार्‍या तीन प्रभागात ८३, झोन ६ मध्ये येणार्‍या तीन प्रभागात ५३, झोन ७ मध्ये येणार्‍या चार प्रभागात १२६ उमेदवार आहेत. निवडणुकीत भाजपाचे ६८, काँग्रेसचे ७४, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ८५, युवा स्वाभीमान पक्षाचे ४२, शिवसेना शिंदे गटाचे ७२, शिवसेना उबाठा ४२, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे १६, वंचित बहूजन आघाडी- युनायटेड फोरमचे ४८, एमआयएमचे १०, इतर पक्ष व अपक्ष २२५ उमेदवार आहेत.
 
 
बंडखोर झाले थंड
 
 
विशेष म्हणजे पक्षाने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल करणार्‍या काही दिग्गजांनीही अखेरच्या दिवशी मैदान सोडले आहे. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर काही बंडखोरांनी मैदान सोडले असून काँग्रेसमधीलही बंडखोर थंड करण्यात पक्षनेतृत्वाला यश आले आहे. युतीत असलेल्या युवा स्वाभीमानच्या उमेदवारांनी माघार न घेतल्याने भाजपसमोरील मित्रपक्षाचे आव्हान कायम आहे.
 
 
भाजपाचे पाठींब्याचे पत्र ठरले व्यर्थ
 
 
भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी वरिष्ठांसोबत झालेल्या चर्चेनंतर भाजपाची अधिकृत उमेदवारी दिलेल्या प्रभाग क्रमांक ११ येथील शैलेश राऊत, प्रभाग २१ येथील गौरव बांते, प्रभाग १७ येथील मृणाल चौधरी यांच्या जागी युवा स्वाभिमानच्या अनुक्रमे सुरज चौधरी, किरण अंबाडकर, प्रियंका पाटणे यांना भाजपाचा पाठींबा देत असल्याचे पत्र प्रसिद्धीला दिले. असे असले तरी हे पत्र फक्त समाधान करण्याचे काम करणार आहे. भाजपाचे उपरोक्त तीनही उमेदवार मैदानात चिन्हासह कायम राहणार आहे.